अखेर वीज आयोगाने घेतली माघार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:08 PM2018-02-28T22:08:53+5:302018-02-28T22:09:18+5:30
१ जानेवारी २०१८ व त्यानंतर सर्व प्रकरणांवर केवळ अध्यक्षांसमक्ष सुनावणी होईल व आदेशावर पुनर्विचारासाठी दाखल होणाऱ्या प्रकरणांवर अन्य सदस्य सुनावणी घेतील असा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेऊन यासंदर्भात १५ डिसेंबर २०१७ रोजी ठराव पारित केला होता. त्या ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्यामुळे आयोगाने माघार घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १ जानेवारी २०१८ व त्यानंतर सर्व प्रकरणांवर केवळ अध्यक्षांसमक्ष सुनावणी होईल व आदेशावर पुनर्विचारासाठी दाखल होणाऱ्या प्रकरणांवर अन्य सदस्य सुनावणी घेतील असा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेऊन यासंदर्भात १५ डिसेंबर २०१७ रोजी ठराव पारित केला होता. त्या ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्यामुळे आयोगाने माघार घेतली आहे. वादग्रस्त ठराव तीन दिवसांत मागे घेतला जाईल अशी ग्वाही आयोगाने बुधवारी न्यायालयाला दिली.
यासंदर्भात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने जनहित याचिका दाखल केली होती. आयोग ठराव मागे घेणार असल्यामुळे न्यायालयाने मूळ उद्देश पूर्ण झाल्याचे निरीक्षण नोंदवून याचिका निकाली काढली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरणावरील पहिल्याच सुनावणीनंतर वादग्रस्त ठरावावर अंतरिम स्थगिती दिली होती. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.