नागपूर : नागपूर-इटारसी मार्गावरील पांढुर्णा रेल्वे स्थानकाला इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुविधायुक्त करण्यात आले आहे. ३० मे २०२३ रोजी तिसरी लाईन सुरू करून पांढुर्णा स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली. हे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग नवीनतम आरडीएसओ मार्गदर्शक तत्त्वे आणि स्टँडबाय फ्यूज अलार्म, इंटिग्रेटेड पॉवर सप्लाय सिस्टम आणि फायर अलार्म सिस्टम यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानासह परिपूर्ण आहे.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही सिग्नल यंत्रणांची एक प्रणाली आहे. जी ट्रॅकच्या प्रणालीद्वारे ट्रेनमधील परस्परविरोधी हालचालींना प्रतिबंधित करते. चुकीच्या क्रमाने सिग्नल बदल होण्याच्या प्रक्रियेला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला हा एक सुरक्षेचा उत्तम उपाय आहे. जोपर्यंत मार्ग सुरक्षित असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणत्याही ट्रेनला पुढे जाण्याचे संकेत मिळत नाहीत.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्य सुरू करताना, सिग्नलिंग कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी सर्व इनडोअर आणि आउटडोअर सिग्नलिंग गिअर बदलविण्यात आले, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम सिस्टमच्या विश्वासार्हतेवर आणि ट्रेनच्या धावण्यावर होणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही संगणक आधारित सिग्नलिंग प्रणाली आहे. जी सिग्नलिंग प्रणालीमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करते. ज्यामुळे रेल्वेगाडीची सुरक्षितता अधिक वाढते. या प्रणालीत वेब स्विचसह नवीन पॉइंट्सदेखील आहेत.
अधिक संख्येने गाड्या धावतीलही प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे, नागपूर-इटारसी विभागात अधिक संख्येत आणि अधिक वेगात रेल्वेगाड्या धावू शकतील, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.