लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात ९ हजार ६७१ बॅलेट युनिट, ५ हजार ४४० कंट्रोल युनिट तर प्रथमच ५ हजार ८६६ व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्र्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्रांचे वितरण करताना निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मॅनेजमेंट सॉॅफ्टवेअरच्या आधारे पहिले रॅण्डोमायझेशन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.बचतभवन सभागृहात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी वापरावयाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्रांच्या रॅण्डोमायझेशन विविध पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा व ईव्हीएम संदर्भातील नोडल अधिकारी तथा अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघासाठी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र व व्हीव्हीपॅट मशीन निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सरमिसळ पद्धतीने वापर करायचा आहे. यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तयार केले असून लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघासाठी मतदान केंद्रानुसार यंत्रांची आवश्यकता तसेच अतिरिक्त राखीव मतदान यंत्र निश्चित करुन त्यानुसार ईव्हीएम मशीन क्रमांक व ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. बॉक्स क्रमांकासह रॅण्डोमायझेशन करण्यात आले व त्यानुसार विधानसभा मतदार संघनिहाय निश्चित केलेल्या तसेच अतिरिक्त राखीव मशीन्स विधानसभा मतदार संघामध्ये विशेष तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात येणार आहेत. शुक्रवारी पहिले रॅण्डोमायझेशन पूर्ण झाले आहे. यासंदर्भातील संपूर्ण माहिती राजकीय पक्षांच्या पक्ष प्रतिनिधींना देण्यात आली व त्यांच्याच उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र उपलब्ध करुन देताना बॅलेट व कंट्रोल युनिट वितरित करताना सरासरी २४ टक्के राखीव तर व्हीव्हीपॅट यंत्र सरासरी ३३ टक्के राखीव यंत्रांचा समावेश करुनच विधानसभा मतदार संघनिहाय बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांचे पहिले रॅण्डोमायझेशन पूर्ण केल्याची माहिती अश्विन मुदगल यांनी दिली.