कसे बदलणार रोज दर? : पंपावर वाढली भांडणे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारतर्फे १६ जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे रोज दर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे. परंतु त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी नसल्याने शहरातील कोणत्याही पेट्रोलपंपावरील इलेक्ट्रॉनिक्स बोर्डवर नवीन रेट दिसून येत नाही. बहुतांश पेट्रोलपंपावरील बोर्ड खराब झालेले आहेत. तेल कंपन्यांना ते दुरुस्त करण्याची कधीच गरज वाटली नाही. मात्र यामुळे ग्राहकांना रोज बदलणारे दर कळणे कठीण झाले आहे. माहिती सूत्रानुसार शहरात सुमारे ३५० पेट्रोलपंप आहेत. परंतु यापैकी बहुतांश पेट्रोलपंपावरील इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड नादुस्त झाले आहेत. फारच कमी पंपावरील बोर्ड व्यवस्थित सुरू आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर तेल कंपन्यांकडून नवीन फ्लेक्स बोर्ड दिले जात आहेत. यावर बोर्डवर रोज नवीन दर लिहिणे आणि ते मिटविण्याचे काम चालत आहे. परंतु ते बोर्ड ग्राहकांच्या सहज नजरेत पडत नसल्याने ग्राहकांना नवीन दर माहीत होत नाही आणि यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये तू-तू-मै-मै च्या घटना वाढत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांनी यापूर्वी पेट्रोलपंपवरील मशीन आॅटोमेशन मोडवर टाकण्याचे काम केले होते. यामुळे तेल कंपन्या आपल्या कार्यालयात बसून पेट्रोल/डिझेल मशीनमधील रेट सेट करू शकत होते. परंतु सध्या शहरातील अशा ४० टक्के मशीनपैकी केवळ २० टक्के मशीनच व्यवस्थित काम करीत आहे. जेव्हा की अन्य ६० टक्के मशीन आॅटोमेशन मोडवर टाकल्याच नाही. अशाप्रकारे २० टक्के नादुरुस्त आणि ६० टक्के सामान्य स्वरूपात सुरू असलेल्या मशीनमधील रेट सेट करण्यासाठी पेट्रोलपंप मालकांना रोज पहाटे ४ वाजतापासून कसरत करावी लागते. पेट्रोलपंप मालकांना मजूर बनविले ‘‘ केंद्र सरकाने कोणतीही पूर्वतयारी न करता रोज पेट्रोल व डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पेट्रोलपंप मालकांना इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड, फ्लेक्स व मशीनमधील रेट बदलण्यासाठी रोज पहाटे ४ वाजतापासून कामावर लागावे लागते. एवढेच नव्हे, तर रात्री ९ वाजतानंतर पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जारी होत असल्याने पंपमालकांना रात्री उशिरापर्यंत जागावे लागते. या व्यतिरिक्त दिवसभर बँकिंगसह अन्य कामे करावी लागतात. अशाप्रकारे सरकारने पेट्रोलपंप मालकांना एक मजूर बनविले आहे.’’ - हरविंदरसिंग भाटिया अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन
पेट्रोल पंपावरील इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड बंद
By admin | Published: June 18, 2017 2:05 AM