नागपूर : काेराडी औष्णिक वीज केंद्रालगत ३०-४० किलाेमीटर परिसरातील गावांना प्रकल्पातील राखेने मरणाच्या संकटापर्यंत आणून साेडले आहे. या संपूर्ण परिसरात हवेत मिसळलेल्या प्रदूषणासाेबत जलप्रदूषणाचा विळखाही घट्ट बसला आहे. भूपृष्ठावरील पाणी असाे की भूजल, दाेन्हीमध्ये शिसे, आर्सेनिक, मर्क्युरी यांसारखे जड धातू आणि इतर धाेकादायक रासायनिक घटक मिसळून गेले आहेत, ज्यामुळे अतिगंभीर अशा जीवघेण्या आजारांचा विळखा नागरिकांभाेवती बसला आहे.
केंद्रातून निघणारी राख तलाव व इतर मार्गाने नदी, नाल्यांसह काेलार व कन्हान नदीच्या प्रवाहात मिसळते व भूजलात मिसळते. असर, सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि मंथन या संस्थांनी २०२१-२२ मध्ये काेराडी वीज केंद्रालगतच्या परिसरातील २१ पैकी १८ गावांमध्ये अनेक ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता, वाॅटर एटीएम वगळता सर्व नमुने अत्यंत प्रदूषित आढळून आले हाेते. हे सर्वेक्षण तिन्ही ऋतूंमध्ये करण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल महानिर्मिती, प्रदूषण नियंत्रण मंडळ व सरकारलाही सादर करण्यात आला; पण प्रदूषणावर नियंत्रणासाठी कुठल्याही उपाययाेजना करण्यात आल्या नाही. नागरिकांना आजारांच्या विळख्यातच साेडून देण्यात आले व आजही त्यात फारसा बदल झालेला नाही.
भूपृष्ठ व भूजलातील नमुन्यांची स्थिती
- बहुतेक नमुन्यात शिसे, आर्सेनिक, ॲल्युमिनियम, लिथियम, आदी विषारी जड धातूंचे प्रमाण १० ते १५ पट अधिक आढळले.
- कन्हान नदीच्या भानेगाव ते पेंच-कन्हान संगमापर्यंत व इतर ठिकाणी मँगेनीज, ॲल्युमिनियम, मॅग्नेशिअम.
- कन्हान नदी ओसीडब्ल्यूचा उपसा ठिकाणचा वरचा प्रवाह : आयर्न, मेलिब्डेनम, लिथियम, फ्ल्युराइड.
- काेलार-कन्हान संगमावरील प्रवाह : मॅग्नेशियम, लिथियम, ॲल्युमिनियम,.
- सुरादेवी, खसाळा, कवठा गावातील पाणी : मॅग्नेशियम, मर्क्युरी, ॲल्युमिनियम, लिथियम.
- म्हसाळा, खैरी गावातील विहिरी, बाेअरवेल : मर्क्युरी, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लिथिअम, ॲन्टिमनी.
- खैरी गावाजवळचा राखेचा ओढा, जिथे जनावरे पाणी पितात, मासेमारी, पाेहणे यांसाठी वापर : आर्सेनिक, मर्क्युरी, मॉलिब्डेनम, सेलेनिअम, लिथिअम, मॅग्नेशिअम, बोरोन.
- याशिवाय वारेगाव, चिचाेली, पाेटा, चणकापूर, भानेगाव, आदी गावांमध्ये पावसाळ्यात जलस्राेतांमध्ये जड धातू व रासायनिक घटकांचे प्रमाण अधिक आढळून आले.
- पावसाळ्यात ॲन्टिमनी, ॲल्युमिनिअम, आर्सेनिक, बोरोन, फ्लुरॉईड, आयर्न, मँगेनीज, मॅग्नेशिअम, मर्क्युरी, मॉलिब्डेनम, लिथिअम, लेड आणि सेलेनिअम यांचे प्रमाण निकषांच्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक आहे.
- पाणी पिण्यासाठी, अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी, इतर घरगुती उपयोग, मासेमारी, सिंचन आणि गाई-गुरांसाठी वापरले जाते.
आराेग्यावर परिणाम
डाॅ. समीर अरबट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व घटक विषारी आहेत. हवेत उडणारे राखेचे कण, धुलिकण त्वरित फुप्फुसांपर्यंत पाेहोचतात व श्वसनाचे आजार हाेतात. बहुतेक गावांमध्ये श्वसनाचे आजार, खाेकला, सर्दी, गळ्याचे आजार, डाेळ्यांचे आजार, त्वचेचे आजार व साेबत स्नायुपेशी व हाडांचे आजार वाढले आहेत. नागरिकांमध्ये गाठीचे आजार वाढल्याचे दिसते. तांब्याचे प्रमाण रक्तात कमी व लघवीत अधिक आढळते. यकृत व मूत्रपिंडाच्या कर्कराेगाचा धाेका असताे. रक्ताचे आजार, स्नायूंचा त्रास व हृदयाचे आजारही अधिक वाढण्याचा धाेका असताे.
कायद्याचे काटेकाेर पालन नाही
वीजकेंद्राच्या राखेमुळे जमीन, शेती व पाण्यासह सर्वच ठिकाणी प्रदूषण वाढले आहे. राख अपघातानेही वाहून जाऊ नये, असा नियम आहे. वीजनिर्मिती केंद्रातून निघणाऱ्या राखेचा १०० टक्के उपयाेग हाेणे कायद्याने बंधनकारक आहे. काेराडी, खापरखेडा केंद्रांत ४० टक्केही राख वापरली जात नाही. चिमणीतून निघणाऱ्या धुरावर एफजीडीसारख्या तंत्राने नियंत्रण आणणे आवश्यक आहे. मात्र कायद्याचे काटेकाेर पालनच हाेत नसल्याने ही भीतिदायक परिस्थिती आहे.
- श्रीपाद धर्माधिकारी, संयाेजक, मंथन अभ्यासकेंद्र.
काेळशाऐवजी वीज आयात फायद्याची
काही वर्षांपूर्वी महाजेनकाेला छत्तीसगडमध्ये काेळसा खाणी देण्यात आल्या. तेथे काेळसा उत्पादन सुरू हाेऊन आयात केली जाईल. मात्र छत्तीसगडच्या काेल ब्लाॅकजवळ पाॅवर प्लँट आहेत व त्यांची क्षमताही अधिक आहे. काेळसा आयातीवर खर्च करण्याऐवजी महाजेनकाेने छत्तीसगडमध्येच वीजनिर्मिती करून त्याचे ट्रान्समिशन विदर्भात करावे. त्याने येथे प्रदूषण तर हाेणार नाही; शिवाय महाजेनकाेची बचतही हाेईल; कारण पॉवर ट्रान्समिशनपेक्षा काेळसा आयात खूप महाग आहे. याबाबत महाजेनकाेचे एमडी यांना निवेदन दिले आहे.
- प्रदीप माहेश्वरी, प्राकृतिक संसाेधन तज्ज्ञ.