विहिंपची भव्य शोभायात्रा : बेटी बचाव, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेशनागपूर : भगवान श्रीकृष्ण सर्वांचे लाडके दैवत. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने आयोजित शोभायात्रेत अत्यंत जल्लोषाचे वातावरण होते. अनेक बालक-बालिका आपल्या पालकांसह राधाकृष्णाची वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी झाले. बेटी बचाव, पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी ज्वलंत विषयावर संदेश देणाऱ्या देखाव्यांचा यात समावेश करण्यात आला होता.विश्व हिंदू परिषदेच्यावतीने वर्धा मार्गावरील गोरक्षण सभा येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा शुभारंभ दीपप्रज्वलन आणि महाआरतीने करण्यात आला. यावेळी महापौर प्रवीण दटके, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, माधवदास महाराज, श्रीरामपंत जोशी, भगीरथदास महाराज, अशोक धोटे, राजे मुधोजी भोसले, गोरक्षण सभेचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार, पोद्दारेश्वर राम मंदिराचे उमेश शर्मा, विश्व हिंदू परिषदेचे नागपूर शहर अध्यक्ष सुदर्शन शेंडे, सुनील काशीकर, रजवंतपालसिंग तुली, देवेंद्र भरतीया, सामाजिक कार्यकर्ता संदीप ठाकरे, हेमंत पुरोहित, प्रिंस मारवाह, रुबी कोहळे, रास्व संघाचे राजेश लोया यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभायात्रेत मुख्य रथावर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून रथ सुशोभित करण्यात आला होता. अनेक बालक-बालिका राधाकृष्णाची वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. नागरिकांनीही मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभाग नोंदविला. युवक डोक्यावर भगवी टोपी घालून हातात तलवारी घेऊन ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्यालाल की’ चा जयघोष करीत होते. शोभायात्रेत २४ देखाव्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक रथावर वेशभूषा केलेले बालक स्वार झाले होते. निकिता किरुळकर या युवतीने साकारलेल्या श्रीकृष्णाच्या सुंदर रांगोळीने गोरक्षण सभा परिसरातील भाविकांचे लक्ष वेधले. संकल्पना स्नेहल कुचनकर हिची होती. सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. गोरक्षण सभा, धंतोली, लोकमत, मेहाडिया चौक, पंचशील चौक, झाशी राणी चौक, लोहापूल चौक, कॉटन मार्केट चौक या मार्गाने गीता मंदिरात पोहोचली. शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)
‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की’
By admin | Published: September 06, 2015 2:48 AM