सुमेध वाघमारे
नागपूर : हत्तीरोगामुळे (लिम्फॅटिक फायलेरिया) शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. रोग झाल्यावर कुठलेच औषध नाही. यामुळे जानेवारी २०१९ पासून राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग सामुदायिक उपचार मोहीम हाती घेण्यात आली होती. आता कोरोनानंतर पहिल्यांदाच हत्तीरोग निर्मूलनाची मोहीम राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे. यात विदर्भातील पाच जिल्हे आहेत. विशेष म्हणजे, यातून नागपूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. यामुळे नागपुरात हत्तीरोग नियंत्रणात आला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागानुसार देशात हत्तीरोगानेग्रस्त असलेले २५६ जिल्हे आहेत. यात महाराष्ट्रातील १८ जिल्हे हत्तीरोगाने संसर्गित आहेत. २०२०-२१ पर्यंत ‘लिम्फोडेमा’चे ३१ हजार २५८ व हायड्रोसीलचे ११ हजार ९२९ प्रकरणांची नोंद झाली आहे. २०१७ च्या आकडेवारीनुसार, नागपूर जिल्ह्यात ४,७५८ व्यक्तींना अवयव सूजण्याचा तर २,८७७ व्यक्तींना गुप्तांगांना सूजण्याचा त्रास होता. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वी ‘डायथिल कार्बामॅझिन सायट्रेट’ व ‘अलबेंडाझॉल’ औषध दिले जायचे. परंतु हत्तीपाय दुरीकरण मोहिमेत ‘आयव्हरमेक्टिन’ या औषधांचाही समावेश करण्यात आला. या ‘ट्रिपल ड्रग’ मोहिमेचा शुभारंभ जानेवारी २०१९ पासून नागपूर जिल्ह्यासह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत हत्तीरोगाचे ‘ट्रिपल ड्रग’ देण्याचे लक्ष्य होते. नागरिकांना आपल्यासमोर औषधे खाऊ घालण्याची यात अट होती. परंतु या मोहिमेची व्यापक जनजागृती झाली नसल्याने व लोकांना रोगाच्या गंभीरतेविषयी माहिती नसल्याने मोहिमेला अपेक्षापेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. परिणामी, मार्च २०२० पर्यंत मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली. परंतु याचदरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्याने व या मोहिमेतील मनुष्यबळ कोरोनाच्या कामासाठी वापरण्यात आल्याने ही मोहीम थंडबस्त्यात पडली.
- गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात तिहेरी औषधोपचार योजना
मंगळवारी झालेल्या या आजारावरील कार्यशाळेत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय ‘एनव्हीबीडीसीपी’चे अतिरिक्त संचालक डॉ. नूपुर रॉय यांनी सांगितले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा हत्तीरोग निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात येत आहे. १ ते १५ जुलैदरम्यान सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए) राबविण्यात येणार आहे. यात विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व यवतमाळ या पाच जिल्ह्यांसोबतच नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या सहा जिल्ह्यांपैकी गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात तिहेरी औषधोपचार योजना (आयडीए) राबविण्यात येणार आहे.
- नागपूर जिल्ह्यात १ टक्क्यापेक्षा कमी जंतूभार
मनपाच्या हिवताप व हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे यांनी सांगितले, नागपूर शहर व ग्रामीणमध्ये राबविण्यात आलेल्या ‘ट्रिपल ड्रग’ मोहिमेचा काय प्रभाव पडला, त्यावरील सर्वेक्षण नुकतेच पार पडले. यात १ टक्क्यापेक्षा कमी जंतूभार आढळून आला. यामुळे हत्तीरोग आटोक्यात असल्याचे यावरून दिसून आले. परंतु आता पुन्हा एक सर्वेक्षण केले जाणार असून, त्या आधारावर हत्तीरोगाची स्थिती कळू शकणार आहे.