नागपूर : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर विद्यार्थी व त्यांचे पालक चिंता व्यक्त करीत आहेत. त्यांना भीती आहे की या निर्णयाचा परिणाम प्रवेशावर तर होणार नाही?
शिक्षण विभाग, तांत्रिक शिक्षण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यात होणाऱ्या प्रवेशाशी निगडित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या निर्णयाचा कुठल्याही विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही. अकराव्या वर्गाचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने होतात. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर रोक लावली होती, त्यानंतर प्रवेश प्रक्रियेतसुद्धा सुधारणा केली होती. विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर कुठलाही परिणाम होणार नाही.
तांत्रिक शिक्षण निदेशालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा परिणाम तांत्रिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार नाही. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. कारण प्रवेश प्रक्रियेदरम्यान मराठा आरक्षण लागू केले नव्हते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीदेखील हीच प्रतिक्रिया दिली.