आशिष दुबे
नागपूर : महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत तिसऱ्या फेरीअखेर ५८,८७५ जागांपैकी २१,४२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अजूनही ६३ टक्के जागा रिक्त आहेत. शहरात ६३ टक्के जागा रिक्त असताना ग्रामीणमध्ये अकरावीचे प्रवेश हाउसफुल्ल झाले आहेत. अनेक महाविद्यालयांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून अतिरिक्त जागा वाढविण्याची मागणी केली आहे.
ग्रामीण भागात विज्ञान व इंग्लिश मीडियम कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे. कला शाखेचे ९५ टक्के प्रवेश निश्चित झाले आहे तर शहरातील स्थिती अतिशय वाईट आहे. केंद्रीय प्रवेश समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वच शाखेच्या जागा रिक्त आहेत. तीन फेऱ्या झाल्यानंतरही भरपूर जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रवेश समितीने या जागा भरण्यासाठी शुक्रवारपासून विशेष फेरीचे आयोजन केले आहे. परंतु ज्युनि. कॉलेजच्या संचालकांना या फेरीतही विशेष प्रवेश होईल, अशी अपेक्षा नाही.
- ५८ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी झाले उत्तीर्ण
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ६० हजारांवर विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर सीबीएससीचे २२ हजारांवर विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तरीही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. शहरातील सीबीएससीचे अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या ज्युनि. कॉलेजमध्येदेखील विज्ञान शाखेच्या जागा रिकाम्या आहे. चार शाळा सोडल्यास उर्वरित शाळेत विज्ञान शाखेत प्रवेशच नाहीत.
- प्रवेशाची स्थिती
शाखा एकूण जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
कला ९४२० २५६३ ६८५७
वाणिज्य १७,७२० ५७३४ ११,९८६
विज्ञान २७,७२९ १२,०२७ १५,६९३
एमसीव्हीसी ४०१५ १०९७ २९१८