नागपूर : बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाचा फार्म्युला जाहीर केला आहे. यात दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार मूल्यांकन झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आहे. या फार्म्युल्यानुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांचा घात करणार आहे. कारण तज्ज्ञांच्या मते, विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला ‘रेस्ट ईअर’ म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात. बोर्डाने मूल्यांकन करताना घेतलेला अकरावीचा आधारच मारक ठरणार आहे.
ही सत्यता शिक्षकांबरोबरच विद्यार्थीही मान्य करीत आहे; पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावीचे ४० टक्के गुणदान करायचे आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की प्रक्रिया किचकट आहे. कोरोनामुळे अनेक ज्युनि. कॉलेजच्या अकरावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात अथवा स्लममधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचण येणार आहे. हे विद्यार्थी वर्षभर ऑनलाइन नव्हते. त्यांनी परीक्षाही दिल्या नाहीत. त्यामुळे गुणदान करताना शिक्षकांपुढे पेच निर्माण होणार आहे.
- काय म्हणतात शिक्षक
- बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होणार आहे. माझ्या अनुभवानुसार विज्ञान शाखेचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला रेस्ट इअर समजतात. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. बोर्डाने मूल्यांकनाचा फार्म्युला ठरविताना दहावी ४०, अकरावी २० आणि बारावी ४० असा ठरविण्याची गरज होती.
प्रा. मनोज हेडाऊ
- कोविडमुळे मूल्यांकनाचा बोर्डाने जो फार्म्युला दिला आहे त्यात केवळ दहावीची परीक्षा खऱ्या अर्थाने झाली आहे, तर अकरावीच्या आणि बारावीच्या फेक परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे फार्म्युला ठरविताना दहावीची टक्केवारी वाढवायला हवी होती.
प्रा. अनिल बारोकर
- विज्ञान शाखेचा अकरावीचा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या तयारीला लागतो. अकरावीच्या अभ्यासाचे तो गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे गुणसुद्धा फार मिळत नाहीत. कोरोनामुळे तर फार नुकसान झाले आहे.
प्रा. रिना देसाई
- बारावीची परीक्षा होईल अशी अपेक्षा होती; पण कोरोनामुळे शक्य झाले नाही. बोर्डाला विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घ्यायचे होते. निकालही लावायचा होता. विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण होते. त्यामुळे बोर्डाने जो काही पर्याय दिला आहे तो स्वीकारावा लागेल.
प्रा. सपन नेहरोत्रा
- विद्यार्थी म्हणतात...
विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो बारावीच्या दृष्टिकोनातून तयारी करतो. त्यासाठी अकरावीकडे दुर्लक्षच करतो. त्यामुळे अकरावीच्या गुणांवर परिणामही होतो; पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो. अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे; पण बोर्डाने दिलेल्या फार्म्युलामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
मयूर साबळे, विद्यार्थी
- आम्ही अकरावीत असताना कोरोना आला. त्यामुळे अकरावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. बारावीत चांगले गुण मिळतील या अपेक्षेने मेहनतही घेतली; पण कोरोनामुळे परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे; पण आता पर्याय नाही.
कृतिका गंथडे, विद्यार्थिनी