नागपूर : ‘जाती तोडो - समाज जोडो’चा नारा देत आरक्षण बचाव महारॅलीला मंगळवारी नागपुरातून दणक्यात सुरुवात झाली. शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघ फिरून शहरातील रॅलीची सांगता मेडिकल चाैक येथे झाली. ही महारॅली बुधवारी मुंबईकडे रवाना हाेणार असून, ३ ऑक्टाेबरला मंत्रालयावर धडक देणार आहे.
मंगळवारी सकाळी संविधान चाैक येथून महारॅलीला सुरुवात झाली. कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे तसेच माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घाेलप, प्रा. राहुल मून, प्रा. रमेश पिसे, प्रा. मधुकर उईके, मीना भागवतकर, नामा जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात सुरू झालेली रॅली पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य, पूर्व, दक्षिण व दक्षिण-पश्चिम नागपूरच्या भागात फिरून रात्री मेडिकल चाैक येथे तिचे समापन झाले. बुधवारी अण्णा भाऊ साठे चाैक, दीक्षाभूमी येथून ही रॅली रवाना हाेणार असून, ३ ऑक्टाेबरला आझाद मैदान, मुंबई येथे महारॅलीचा समाराेप हाेणार आहे.
कास्ट्राईब महासंघ, संविधान परिवार, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, भारतीय बौद्ध महासभा व इतर संघटना एकत्रित करून आरक्षण बचाव कृती समितीद्वारा आयोजित आरक्षण बचाव महारॅली काढण्यात आली आहे. राज्य सरकार ओबीसी, एससी/एसटी, भटके व विमुक्तांचे, आरक्षण बंद करण्याचे षड्यंत्र करीत असल्याचा आराेप महारॅलीतून करण्यात आला. पदोन्नतीतील आरक्षण तत्काळ लागू करावे, अनुसूचित जातींचे वर्गीकरण करण्यात येऊ नये, ओबीसी एस.सी. एस. टी.-व्हीजेएनटीसोबत भेदभाव बंद करावा. बार्टी, महाज्योती समाजकल्याण, आदिवासी विभागाचा निधी मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी वापरू नये, सर्व मुलामुलींना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, शिष्यवृत्ती वेळेवर व महागाईच्या प्रमाणात देण्यात यावी, मागासवर्गीयांवरील अन्याय दूर करावा, या व इतर मागण्या या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या मागासवर्गीय धोरणाविरोधात नागपूर ते मुंबई मंत्रालय महारॅली काढण्यात आल्याचे अरुण गाडे यांनी यावेळी सांगितले.