नागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या सर्वात महत्त्वाची जुनी पेन्शन लागू करणे आणि कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणे या मागणीसह विविध मागण्यांकरिता मंगळवार, १४ मार्चपासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. यामध्ये महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, जि. प. कर्मचारी संघटना, महापालिका कर्मचारी संघटनेसह सर्वच विभागातील कर्मचारी संघटनांनी या संपात सहभागी होण्याचे निश्चित केल्याने जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील कामकाज मंगळवारपासून ठप्प पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचे आवाहन केले आहे. यात सर्वच कर्मचारी संघटनांचा समावेश राहणार आहेत.
संविधान चौकात सभाराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या या बेमुदत संपादरम्यान मंगळवारी सकाळी ११.३० वाजता संविधान चौकात सभा होईल. संपादरम्यान दररोज संविधान चौकात सर्व कर्मचारी एकत्र येतील.
जिल्हा न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणारजिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट- क यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. या संपाच्या समर्थनार्थ न्यायालयीन कर्मचारी मंगळवारी काळ्या फिती लावून काम करतील, असे नागपूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत साखळकर यांनी कळवले आहे.