लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संकट विचारात घेता लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. परंतु लसी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. लसवाटपात महाराष्ट्राच्या बाबतीत होत असलेला भेदभाव दूर करावा व मागणीनुसार लसी उपलब्ध कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लसवाटपातील भेदभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूर करावा, अशी मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांना दिलेल्या निवेदनातून केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो लोकांचे बळी गेले. त्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. लोकसंख्येचा विचार करून लसीचा पुरवठा करण्यात यावा. गुजरात राज्यात ५५ टक्के लोकांचे लसीकरण झाले. हरियाणात ८३ टक्के लोकांचे लसीकरण झाले, तर महाराष्ट्रात ३० टक्केच लोकांना लस मिळाली. लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राला लसी उपलब्ध कराव्यात, अशी मागणी वेदप्रकाश आर्य यांनी केली आहे.