अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणींवरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी आंदोलन केले. या समस्या दूर कराव्या तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. जर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.
८ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाल्या व सुरुवातीला विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. अजूनही थोड्याबहुत प्रमाणात अडचणी येत आहेत. यात ‘अॅप’ लवकर सुरू न होणे, ‘लॉगिन’ न होणे, पेपर सुरू असताना ‘स्क्रीन’ अचानक ‘ब्लँक’ होणे, तसेच ‘सबमिट’चा संदेश न येणे यांचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. सोबतच ‘व्हॉट्सॲप’वरुन अज्ञान व्यक्तीची ‘हेल्पलाईन’ बाबतची ‘ऑडिओ क्लिप’ ऐकून विद्यार्थी संभ्रमित झाले आहेत. कुलगुरुंनी विद्यार्थ्यांसोबत ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद साधावा तसेच अतिरिक्त ‘हेल्पलाईन’ क्रमांकदेखील जारी करावेत, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांना निवेदन देण्यात आले. तीन दिवसात पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागपूर महानगरमंत्री अमित पटले यांनी दिला.