लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई केली. यादरम्यान तब्बल ५०० अतिक्रमण हटविण्यात आले. यात आठ ट्रक वस्तू जप्त करण्यात आल्या, तर २३,५०० रुपये दंडही वसूल करण्यात आला.
मंगळवारी झोनमधील छावणी, दुर्गा माता मंदिरजवळ हॉटेल बब्बू गॅलेक्सीसमोर फूटपाथवर असलेला स्टीलचा पानठेला जप्त करण्यात आला. तसेच मंगळवारी बाजारात फ्रूट मार्केटसमोर दोन चायनीज ठेले व इंदोराजवळ दोन ठेले जप्त करण्यात आले. यानंतर १० नंबर पूल, इंदोरा चौक, जरीपटका ते भीम चौक, मार्टिननगर ते मानकापूर रोड, मानकापूर चौक ते अवस्थीनगर चौक, जाफरनगरपर्यंत फूटपाथवरून ५३ अतिक्रमण हटविण्यात आले. येथून दोन ट्रक माल जप्त करण्यात आला, तर १३ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मनपा उपायुक्त (अतिक्रमण) महेश मोरोणे आणि संबंधित झोनचे सहायक आयुक्त संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
लकडगंज झोनमध्ये कळमना घाट ते जुनी कामठी रोड, कळमना रेल्वे फाटक ते पटेल लॉनपर्यंतचे २६ शेड तोडण्यात आले. ७२ अतिक्रमण हटविण्यात आले. तीन ट्रक माल जप्त करण्यात आला. आसीनगर झोनमध्ये कमाल चौक ते इंदोरा चौक, जरीपटका व फूटपाथवरून ७८ अतिक्रमण हटविण्यात आले. सतरंजीपुरा झोनमध्ये दहीबाजार ते जुना मोटरस्टॅण्ड ते जुना भंडारा रोड, मारवाडी चौकापर्यंत ७६ अतिक्रमण हटविण्यात आले. गांधीबाग झोनमध्ये मेयो रुग्णालय ते भावसार चौक, गीतांजली चौक, अग्रसेन चौकापर्यंत ४२ अतिक्रमण हटविण्यात आले. नेहरूनगर झोनमध्ये ईश्वरनगर चौक ते तिरंगा चौक, सक्करदरा चौक ते भांडेप्लाॅट चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने कारवाई करण्यात आली. येथून ७५ अतिक्रमण हटविण्यात आले. एक ट्रक माल जप्त करण्यात आला. आठ हजाराचा दंडही वसूल करण्यात आला.
हनुमाननगर झोनमध्ये तुकडोजी पुतळा ते मानेवाडा चौक, उदयनगर चौक ते म्हाळगीनगर चौक, हुडकेश्वर चौक ते पिपळा फाटा ते परत म्हाळगीनगर चौक, अयाेध्यानगरपर्यंत चार शेड तोडण्यात आले. ७६ अतिक्रमण हटविण्यात आले. एक ट्रक माल जप्त करण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमध्ये माटे चौक ते अंबाझरी रोड, हिंगणा टी-पॉईंट ते प्रतापनगर रोडपर्यंत ६६ अतिक्रमण हटवून एक ट्रक माल जप्त करण्यात आला.