लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने गुरुवारी धरमपेठ झोन क्षेत्रातील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी परिसरातील अतिक्रमणाचा सफाया केला.
रामगिरी परिसरातील ठेले जप्त करण्यात आले. त्यानंतर पथकाने डब्ल्यूसीएल मुख्यालय ते टीव्ही टॉवर ते वायुसेनानगर मार्गालगत बांधण्यात आलेली अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. टीव्ही टॉवर येथे कारवाई करताना १०० ते २०० विक्रेत्यांनी कारवाईला विरोध केला. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तणाव लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून कारवाई करण्यात आली.
पथकाने २७ शेड, ३ ओटे व २ चिकन सेंटरच्या दुकानाचे अनधिकृत बांधकाम तोडले. कारवाईदरम्यान पाच ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
गांधीबाग झोनच्या पथकाने महाल ते शिवाजी पुतळा आणि नंगा पुतळा दरम्यानच्या रस्त्यालगत फूटपाथवरील दुकाने हटविली. एक ट्रक साहित्य जप्त करून १० हजार रुपये दंड वसूल केला. संध्याकाळी तुळशीबाग रोड येथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेले भोसले राजे यांच्या मालकीचे हनुमान मंदिर हटविण्यासाठी मंदिरातील पाच फूट उंचीची मूर्ती काढण्यात आली. ही कारवाई गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.