नागपूर : शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान शुक्रवारी आसीनगर झोनमधील नारीमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. यावेळी दोन निवासी आणि २२ व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्यात आली. सुरुवातीला नागरिकांनी कारवाईचा विरोध केला. परंतु समजविल्यानंतर ते शांत झाले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत एका जनहित याचिकेवर आदेश जारी केला होता. त्यामुळे नागपूर शहर तहसील कार्यालय आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त (अतिक्रमण) महेश मोरोणे, नायब तहसीलदार सुनील साळवे, विभाग अधिकारी राजेश देठे, मलिये, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यासोबत शहरात शुक्रवारी ५०० अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी १० ट्रक साहित्य जप्त करून ९५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमध्ये माटे चौक ते आयटी पार्क, प्रतापनगर ते खामला रोड, बजाजनगर रोड ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत दोन्ही बाजूने फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये झोन कार्यालय परिसरातील अस्थायी अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर झोन कार्यालय ते रामनगर चौक, रविनगर चौक, अमरावती रोडवरील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले. नेहरूनगर झोनमध्ये झोन कार्यालयापासून महाकाळकर सभागृह, अयोध्यानगर चौक, न्यू सुभेदार ले-आऊटपासून म्हाळगीनगर चौक, उमरेड रिंग रोडवरील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. गांधीबाग झोनमध्ये भावसार चौक ते नंगा पुतळा, धारस्कर चौकापर्यंतचा रस्ता व फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत जुने मोटर स्टँड, भंडारा रोड ते दहीबाजार पूल, मस्कासाथ रोड ते गोळीबार चौक, पाचपावलीमधील अतिक्रमण हटविण्यात आले. लकडगंज झोनमध्ये अंबेनगरात हायटेंशन लाईनच्या खालील १८ अस्थायी शेड तोडून ९ ठेले जप्त करण्यात आले. मंगळवारी झोनमध्ये झोन कार्यालय ते पागलखाना चौक, मानकापूर चौक, फरस चौक ते झिंगाबाई टाकळी, गोधनी नाका ते झिंगाबाई टाकळी, अवस्थी चौक ते सीआयडी कार्यालय चौकापर्यंत फुटपाथवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला.
.............