नागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयात काही कर्मचाऱ्यांच्या केवळ कागदोपत्री बदल्या करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. यामुळे महत्त्वाच्या टेबलवर नव्या लोकांना काम करण्याची संधीच नाकारली जाते, अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे.दर तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असा नियम आहे. असे असतानाही जिल्ह्यातील महसूल सेवेत काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर काम करीत आहेत. वादग्रस्त प्रसंग घडला किंवा तक्रारी आल्या तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. पण हे करताना कधी त्यांना कार्यमुक्त केले जात नाही किंवा बदली झाल्यवर कालांतराने पुन्हा तो क र्मचारी त्याच टेबलवर परत येईल, अशी तजवीज केली जाते. यामुळे एकीकडे कर्मचाऱ्याची बदली झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र स्थिती जैसे थे असते. अशी काही उदाहरणे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात दिसून येते. ग्रामीण तहसील कार्यालयात एका कर्मचाऱ्याची बदली हिंगणा तालुक्यात झाली. पण त्याला कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे तो आहे त्याच जागेवर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही एका वादग्रस्त प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात बदली झाल्यावर पुन्हा काही महिन्यानंतर जुनाच टेबल त्याच्याकडे सोपवण्यात आला. निलंबन, सेवासंलग्नच्या काही प्रकरणात अशाच प्रकारचे सोयीचे निर्णय घेण्यात आले आहेत. वाहन चालकांच्या पदांबाबतही काही तक्रारी आल्या आहेत. बदली झाल्यावरही कार्यमुक्त न केल्याने काही अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी चालकच नसल्याने त्या उभ्या आहेत. नियम डावलून काम करण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला त्याच्या विभागातून इतरत्र हलविण्यात आले आहे.नवीन सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणात पारदर्शकता आणण्यासाठी पावले उचलली आहेत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतानाही काही नियम आखून दिल्यास कर्मचाऱ्यांना नवीन टेबलवर काम करण्याची संधी मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बदल्यांच्या मुद्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
By admin | Published: February 26, 2015 2:15 AM