नागपूर : कायदा आणि समाजाला न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी संविधानात्मक मूल्यांसह पुढाकार घेणे आवश्यक आहे. विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा, त्यामुळे त्यांंना कधीच अपयश येणार नाही, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी येथे केले.
नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. वारंगा, बुटीबाेरी येथील विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात आयाेजित या दीक्षांत समारंभाला देशाचे माजी सरन्यायाधीश व विद्यापीठाचे संस्थापक कुलपती न्या. शरद बोबडे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती न्या. भूषण गवई, प्र-कुलपती व मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश न्या. संजय गंगापूरवाला, न्या. सुनील शुक्रे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. अनिल किलोर, न्या. भारती डांगरे, इंडियन बार असोसिएशनचे अध्यक्ष मनन मिश्रा, ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. विजेंदर कुमार व कुलसचिव डाॅ. आशिष दीक्षित उपस्थित होते.
सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड म्हणाले, संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील विषमता आणि जातीभेद यांच्यावर मात करून संपूर्ण विश्वात एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून ख्याती प्राप्त केली. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या दस्तऐवजात परिवर्तनात्मक क्षमता असून संविधानाच्या प्रास्ताविकेत संविधानाचे तत्त्व अंगीकृत केलेले आहेत. त्यामुळे आपण विधिज्ञ म्हणून आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय सर्वांना देण्याचे वचन घेतले पाहिजे.
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी कोविड काळातही विद्यापीठाच्या वारंगा येथील इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे तसेच उच्च शिक्षण तंत्रज्ञान विभागाचे आभार मानले.
कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा सादर केला.
दया आणि न्याय यांच्यात गफलत करू नका
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यावेळी 'दया आणि न्याय ' यांच्यातील फरकसुद्धा अधोरेखित केला. ते म्हणाले, न्यायामुळे समाज हा सक्षम आणि स्वयंपूर्ण होतो तर दयेमुळे केवळ काही क्षणासाठी अन्यायाचे दुःख दूर होते. केवळ दयादानाचे काम न करता न्यायादानाला अनुकूल असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करताना न्यायाची दयेसोबत गफलत करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अद्वय हरिसिंगने पटकावले चार सुवर्णपद, अद्वयसह अवनी दुबे, अर्पित लाहोटी, अदिती त्रिपाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी
यावेळी २२० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यात पदवीच्या दाेन बॅचमध्ये एल. एल. बी. झालेल्या १५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. २०१६ ते २०२० पर्यंतच्या पाच बॅचमधील ५६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर एल. एल. एम. पदवी प्रदान करण्यात आली. तर ६ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी शैक्षणिक सत्रात सर्वाेत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांना २५ सुवर्णपदकांनी गाैरविण्यात आले. यात अद्वय हरिसिंगने सर्वाधिक चार सुवर्णपदे पटकावली. अद्वयसोबतच अवनी दुबे, अर्पित लाहोटी व अदिती त्रिपाठी हे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरले. अदिती ही विदेशात शिक्षण घेत असल्याने तिचे तीन सुवर्णपदक तिच्या आईने स्वीकारले.