नागपूर : बंगळुरूवरून पाटणा येथे जात असलेल्या गो -एअरचे विमान शनिवारी आपात्कालीन परिस्थितीत नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. या विमानात क्रु मेंबरसह एकूण १३९ प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जी-८८७३ हे विमान बंगळुरू येथून पाटण्याला जात होते. विमानातील इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने विमानातील पायलटने हे विमान नागपूर विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला. या इमरजन्सी लँडिंगची माहिती तातडीने दिली. यानंतर डिझास्टर मॅनेजमेन्ट टीम अलर्ट झाली. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच एटीसीने नागपूर विमानतळाला याची सूचना दिली. विमानतळ व्यवस्थापनाने सुरक्षित लँडिंगसाठी सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली. चार फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स उपलब्ध होती.
हे विमान सकाळी ११.२० वाजता नागपूर विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानातील बिघाड दुरुस्त केला जात असून, प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाटण्याला पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.