सुमेध वाघमारे
नागपूर : कोविडच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयांपर्यंत पोहचवून त्यांचे प्राण वाचविण्यामध्ये ‘१०८’ रुग्णवाहिकेचा मोठा हातभार लागत आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा व गडचिरोली या सहा जिल्ह्यातील कोरोनाशी संबंधित ६४,२७३ रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णसेवा देत असताना रुग्णवाहिकेतील १२ डॉक्टर व २३ चालक पॉझिटिव्ह आले होते. शिवाय, रुग्णांच्या संपर्कात आलेले १३० डॉक्टर व चालकांना होम क्वारंटाईन व्हावे लागले. कोरोनाशी लढा देत हे डॉक्टर व परिचारिका पुन्हा कामावर परतले असून, हे खरे ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ची ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्यात जवळपास ९३७ रुग्णवाहिका आहेत. यात २३३ ‘अॅडव्हान्सड् लाईफ सपोर्ट(एएलएस) तर ४०७ ‘बेसिक लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स (बीएलएस) आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून ११० रुग्णवाहिका आहेत. यात ‘एएलएस’ २७ तर ‘बीएलएस’ ८३ आहेत. यांच्या सेवेत २९७ डॉक्टर कार्यरत आहेत.
- नागपूर जिल्ह्यातील १२,५५१ रुग्णांना मदत
नागपूर जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका आहेत. यात ‘एएलएस’ ९ तर ‘बीएलएस’ ३१ आहेत. मार्च ते नोव्हेंबर या नऊ महिन्याच्या काळात कोविडबाधितांसह संशयित १२,५५१ रुग्णांना सेवा देण्यात आली. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक २९,६६६ रुग्णांना रुग्णवाहिकेची मदत झाली. या जिल्ह्यात ‘एएलएस’ ७ तर ‘बीएलएस’ १६ आहेत. भंडारा जिल्ह्यात ११ रुग्णवाहिकेच्या मदतीने ४,६९७ रुग्णांना, गडचिरोली जिल्ह्यात १० रुग्णवाहिकेच्या मदतीने १,१६२ रुग्णांना, गोंदिया जिल्ह्यात १५ रुग्णवाहिकेच्या मदतीने ९,०७८ रुग्णांना तर वर्धा जिल्ह्यात ११ रुग्णवाहिकेच्या मदतीने ७,११९ रुग्णांना सेवा देण्यात आली.
- १२ डॉक्टर, २३ चालक पॉझिटिव्ह
रुग्णवाहिकेतील कोरोनाबाधितांना तातडीने ऑक्सिजन लावण्यापासून ते आवश्यक औषधोपचार करणारे आतापर्यंत १२ डॉक्टर व २३ चालक पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय जिल्हा व्यवस्थापक, सुपरवायझरही यातून सुटले नाही. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ५२ डॉक्टर व ७८ चालकांना होम आयसोलेशनची गरज पडली होती. या सर्व समस्यांना तोंड देत १०८ ची सेवा निरंतर सुरू असल्याचे ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चे ऑपरेशन हेड, दीपककुमार उके यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली.
- डॉक्टर्स, चालक २४ तास रुग्णसेवेत
कोविड रुग्णांच्या सेवेत १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टर व चालक २४ तास रुग्णसेवा देतात. यांना कोविडचे रुग्ण हाताळण्यासोबतच पीपीई किट घालण्याचे व काढण्याचे प्रशिक्षण प्राप्त आहे. त्यांना सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
- दीपककुमार उके
ऑपरेशन हेड, ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’
- जिल्हानिहाय रुग्णवाहिकेतून रुग्णसेवा
जिल्हारुग्ण
नागपूर१२,५५१
भंडारा४,६९७
चंद्रपूर२९,६६६
गडचिरोली१,१६२
गोंदिया ९,०७८
वर्धा ७,११९