नागपूर : बुद्धिझमचा खऱ्या अर्थाने व्यावहारिक पैलू ज्यात समता, मानवता, उदारता अशी सर्व समावेशकता आहे. बुद्धिझमचा सेक्युलर पैलू सम्राट अशोकाने खऱ्या अर्थाने जगापुढे आणून भारतीय संस्कृतीचे तत्व रुजविले, असे मत नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाचे प्रमुख डॉ. निरज बोधी यांनी व्यक्त केले. पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे आयोजित प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या २३२७ व्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पाली विभागाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. तुळसा डोंगरे होत्या. यावेळी डॉ. डोंगरे म्हणाल्या, सम्राट अशोकाने स्वतःचा मुलगा महिंद्र व मुलगी संघमित्रा या दोघांनाही धम्माला दान देऊन बौद्ध तत्त्वज्ञानातील दान पारमितेचा उच्चांक गाठला. एवढेच नव्हे तर विनयाचे पालन न करणाऱ्या ६० हजार बौद्ध भिक्षूंचे चीवरही उतरविले.
यावेळी प्रा. डॉ. सुजित वनकर, प्रा. डॉ. ज्वाला डोहाणे, सिद्धार्थ फोपरे, अलका जारुंडे, ॲड. अवधूत मानवटकर, सुभाष बोंदाडे, दिशा वानखेडे आदींनी सम्राट अशोकाच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन उत्तम शेवडे यांनी केले. डॉ. वासुदेव बारसागडे यांनी आभार मानले.