लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : महादुला, कोराडी व नांदा (कोराडी) येथे अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे. या भागात साेमवारी (दि. २३) आणखी एक रुग्ण आढळून आल्याने रुग्णात भर पडली आहे. त्या अनुषंगाने आराेग्य विभागाने सर्वेक्षणाला सुरुवात केली असून, पहिल्याच दिवशी १७४ घरांची तपासणी करण्यात आली.
यासंदर्भात लाेकमतमध्ये साेमवारी ‘डेंग्यूचे तीन रुग्ण दगावले’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत गुमथी प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल राऊत यांच्या आदेशान्वये आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घराेघरी जाऊन नागरिकांची तपासणी व घराची पाहणी करायला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी साेमवारी एकूण १७४ घरांचे सर्वेक्षण केल्याचेही डाॅ. राहुल राऊत यांनी सांगितले. आरोग्य पर्यवेक्षक बारापात्रे, बळवंत खराबे, दुर्वास नारनवरे, ज्योती यादव यांच्यासह आशासेविका सर्वेक्षण करीत आहेत.
डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांची साेमवारी तपासणी करण्यात आल्याचे डाॅ. राहुल राऊत यांनी सांगितले. बाेखारा येथेही डेंग्यूच्या रुग्णात वाढ हाेत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. दुसरीकडे, नागरिकांनी डासांचा बंदाेबस्त करण्यासाठी याेग्य काळजी घ्यावी, काेरडा दिवस पाळावा, मुलांना पूर्ण कपडे घालून द्यावे, लक्षणे आढळल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषधाेपचार सुरू करावा, घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, कुठेही पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने यांनी केले आहे.
...
प्रतिबंधक उपाययाेजनांचा अभाव
आराेग्य विभागाने स्वच्छतेचा अभाव असलेल्या भागाचे सर्वेक्षण करावे व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागातील काही भूखंडांवर पाण्याचे डबके साचले आहे. काही भागात माेठ्या प्रमाणात गवत व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे डासांची पैदास वाढत आहे. यावर स्थानिक नगर पंचायत व ग्रामपंचायत प्रशासन काहीही करायला तयार नाही. काही भागात ग्रामपंचायत प्रशासनाने अजूनही डास प्रतिबंधक औषधांची धूरळणी केली नाही.