लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील विकास महामंडळानी शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासोबतच रोजगार निर्मिती करण्यासाठी प्राप्त निधीचा विनियोग करावा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिले. राजभवनातील सभागृहात १९ डिसेंबर रोजी विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळच्या अध्यक्षांची बैठक राज्यपाल कोश्यारी य्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव रणजित कुमार आणि मंडळाचे सदस्य सचिव हेमंतकुमार पवार (विदर्भ) विजयकुमार फड (मराठवाडा) आणि विलास पाटील (उर्वरित महाराष्ट्र) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.राज्यपाल कोश्यारी म्हणाले, राज्यातील तिन्ही विकास मंडळांना प्रत्येकी ५० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. विकास मंडळानी या निधीचा विनियोग ३१ मार्च २०२० पूर्वी करणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीसाठी या निधीचा परिपूर्ण वापर करून त्या क्षेत्रातील मागासलेपण दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.यावेळी मराठवाडा विकास मंडळाने विकासाच्या नियोजनाचे सादरीकरण केले. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन दिल्लीचे डॉक्टर राज यांनी स्वास्थ्य साहाय्य या उपकरणाची यावेळी माहिती दिली. आरोग्य सेवेमध्ये विविध आजारांच्या चाचण्या करण्यासाठी या उपकरणाची उपयुक्तता विशद केली.
रोजगार निर्मितीवर भर द्या : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:30 PM
राज्यातील विकास महामंडळानी शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासोबतच रोजगार निर्मिती करण्यासाठी प्राप्त निधीचा विनियोग करावा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिले.
ठळक मुद्देराज्यातील विकास महामंडळांची बैठक