लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान ० ते १३ वर्षे वयोगटातील मुलाच्या मातांना प्राधान्याने कोविड लस देण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सोमवारी दिले.
छत्रपती सभागृहात पोषण महिन्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण ईश्वर लखोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी काटोलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व इतर तसेच क्षेत्रीय कार्यालयातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.
‘सही पोषण देश रोशन’ या संकल्पनेवर विविध उपक्रम राबविण्यात येतील. मानवी जीवनात पोषणाचे अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. पोषणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी जरी हा महिना साजरा करण्यात येत असला, तरी कोविड लसीकरणावर भर द्यावा. कोराेनाच्या काळात सुपोषणाची गरज अधोरेखित झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.