लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली असल्यामुळे कष्टकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. समाजातील अशा गरजूंना विदर्भभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सहकार्याचा हात देण्यात येत आहे. नागपुरात संघाकडून गरजूंच्या मदतीसाठी ‘मायक्रो प्लॅनिंग’वर भर देण्यात आला आहे. त्यामुळे तळागाळापर्यंत मदत पोहोचविणे शक्य होत आहे. लोककल्याण समितीकडून यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला असून पं.बच्छराज व्यास विद्यालयातील केंद्रीय संकलन केंद्रात सर्व शिधा व वस्तू एकत्रित होत आहे. येथून दररोज शहरभरातील हजारो गरजूंना ‘कुकिंग किट’चे वाटप सुरू आहे.विदर्भातील सर्व मोठ्या शहरांमध्ये गरजूंपर्यंत भागनिहाय मदत पोहोचविली जात आहे. नागपुरातील ३८० झोपडपट्ट्यांवर विशेष ‘फोकस’ करण्यात आला आहे. सुरुवातीला संघाकडून ‘फूड पॅकेट्स’ वाटण्यात आले. परंतु जेवणाशिवाय इतरही जीवनावश्यक वस्तूंची लोकांना गरज आहे हे लक्षात आल्यावर ‘कुकिंग किट’चे वाटप सुरू झाले. साधारणत: एका महिनाभर एका कुटुंबाला पुरेल इतके धान्य व इतर जीवनावश्यक गोष्टींचा यात समावेश आहे. सुरुवातीला नगर व भाग स्तरावर संकलन व वाटपाचे काम झाले. परंतु त्यानंत सुसूत्रता यावी यासाठी महानगर पातळीवर याचे नियोजन करण्यात आले. शहरभरात स्वयंसेवक विविध दानदात्यांकडून निधी किंवा शिधा व किराणा सामान गोळा करत आहेत. त्यानंतर थेट केंद्रीय संकलन केंद्रात सर्व गोष्टी एकत्रित करण्यात येत आहे. सर्व शिधा योग्य पद्धतीने साठवणे, हाताळणे व ‘पॅकिंग’ याची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज हजाराहून अधिक ‘कुकिंग किट’ तयार होतात व त्यांचे वितरण होते. प्रत्येक कार्यासाठी स्वयंसेवकांची यादी अगोदरच तयार झाली आहे. सर्व मालाचा योग्य हिशेब ठेवण्यात येत आहे. त्यामाध्यमातून मागणी व पुरवठा यांच्यातील ताळमेळ कायम असल्याची माहिती महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम यांनी दिली. बºयाच ठिकाणी स्वयंसेवकांनी विविध संस्थांच्या माध्यमातून पोळ्या बनविणे, खाण्याचे पॅकेट्स बनविणे, पोलिसांना चहा-ताक वाटणे असे अनेक उपक्रम सुद्धा हाती घेतले आहेत.वैद्यकीय हेल्पलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन‘कोरोना’संदर्भात अद्यापही लोकांमध्ये संभ्रम आहे. थोडा ताप जरी आला तरी लोक घाबरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन संघाकडून ‘डॉक्टर्स हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली आहे. विविध तज्ज्ञ डॉक्टर्स यात नागरिकांना फोनवर मार्गदर्शन करत आहेत. लोकांचे मानसिक आरोग्य जपण्यावर यामाध्यमातून भर देण्यात येत आहे.
संघातर्फे गरजूंच्या मदतीसाठी 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:52 PM
‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली असल्यामुळे कष्टकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. समाजातील अशा गरजूंना विदर्भभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सहकार्याचा हात देण्यात येत आहे.
ठळक मुद्देलोककल्याण समितीतर्फे पुढाकार : केंद्रीय संकलन केंद्रातून शहरभरात गरजूंना ‘कुकिंग किट’चे वाटप