लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्सची संख्या कमी करावी. यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश खा. डॉ. विकास महात्मे यांनी दिले. संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज बचत भवन येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला ऑनलाईन माध्यमातून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देखील सहभागी झाले होते. सोबतच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, समितीचे अशासकीय सदस्य अशोक करंदीकर, चंद्रशेखर मोहिते, राजू वाघ उपस्थित होते. रस्ता समितीने सुचविलेल्या ६६ ब्लॅक स्पॉटपैकी ४५ ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. यावेळी शहर पोलीस वाहतूक विभाग व समिती सदस्य चंद्रशेखर मोहिते यांनी शहरातील अपघात कमी करण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचित करण्यात आले.
केंद्राच्या विकास योजनांना ग्रामीणमध्ये गती द्या
जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समिती(दिशा)ची बैठकदेखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान केंद्राच्या विकास योजना ग्रामीण भागात पोहोचविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची सूचना डॉ. महात्मे यांनी केली. एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत कमी वजनाच्या व तीव्र कमी वजनाच्या बालकांना पूरक पोषण आहार देऊन साधारण श्रेणीमध्ये आणण्याचे प्रयत्न करण्याचे निर्देश डॉ. महात्मे यांनी दिले.