लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. अनेक लोक तर दवाखान्यात किंवा अन्य ठिकाणी गेल्याने संक्रमित होतात काय, हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो. परंतु सौम्य लक्षणे असली तरी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आजारमुक्त होण्यासाठी माणसाला निसर्गाशी एकरूप व्हावे लागेल. प्राणायाम, व्यायाम आणि मानसिक आरोग्य सुदृढ करण्यावर लक्ष केंद्रित केले तर खराब झालेली प्रकृतीही बरी होऊ शकते, असे मत शल्य चिकित्सक डॉ. संजय गाडेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित ऑनलाईन व्याख्यानादरम्यान ते बोलत होते.
कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू संजय दुधे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण उपस्थित होते. कुठल्याही आजाराची औषधे घेतल्यानेच व्यक्ती बरा होतो असे नाही. औषधाने तुमचा त्रास, लक्षणे कमी होतात. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात काहीतरी व्याधी या असतातच. आपले शरीर आपल्याला अनेकदा चेतावणीही देत असतो. तेव्हा हे वेळीच ओळखून आपण उपचार घ्यायला हवे. आपण वेळीच रोग ओळखून सावध झालो तर नैसर्गिकरीत्याही तो बरा होऊ शकतो. त्यामुळे निसर्गाशी एकरूप व्हा आणि आरोग्य जपा, असा सल्लाही डॉ. गाडेकर यांनी दिला. विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. अभय मुदगल यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.