मांढळ येथील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : मांढळ हे कुही तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून, माेठी बाजारपेठ आहे. जेवढे माेठे हे गाव आहे, तेवढीच दुर्दशा येथील अंतर्गत रस्त्यांची आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांवर सर्वत्र खड्डे व डबक्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येते. या रस्त्यांवरून नागरिकांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे.
मांढळ येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राथमिक आराेग्य केंद्र, काही शासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये असल्याने तालुक्यातील बहुतांश गावांमधील शेतकरी व नागरिकांचा मांढळशी थेट संबंध येताे. गावाच्या प्रवेशद्वारापासून तर प्राथमिक आराेग्य केंद्रापर्यंतच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. याच रस्त्यावर बँक व काही शासकीय कार्यालये आहेत.
स्थानिक व परिसरातील गावांमधील रुग्णांना याच रस्त्याने प्राथमिक आराेग्य केंद्रात न्यावे लागत असल्याने त्यांचे प्रचंड हाल हाेतात. या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना एकीकडे अपघात हाेत असून, त्यातून वाहनचालकांना दुखापती हाेत आहेत. दुसरीकडे वाहनांच्या चाकांमुळे डबक्यातील गढूळ पाणी व चिखल कपडे व अंगावर उडत असल्याने नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागत आहे. नागरिकांना राेज हाेणारा त्रास लक्षात घेता या रस्त्यांची तातडीने दुुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
...
प्रतीकात्मक धान राेवणी
रस्त्यांच्या या बिकट अवस्थेकडे स्थानिक लाेकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पुरेसा निधी प्राप्त हाेत नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिकारी सांगतात. मागील वर्षी याच रस्त्यावरील महाराष्ट्र बँक चाैकातील खड्ड्यात प्रतीकात्मक धान राेवणी करून तरुणांनी प्रशासनाच्या उदासीन धाेरणाचा निषेध नाेंदविला हाेता. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने खड्ड्यांजवळ मुरुमाचे ढीग टाकले. ताे मुरुम पसरविला नाही.
...
भूमिपूजन झाले, दुरुस्ती कधी?
प्रवेशद्वार ते प्राथमिक आराेग्य केंद्रादरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाचे अडीच वर्षांपूर्वी माजी आमदाराने भूमिपूजन केले हाेते. यात नाली बांधकामाचाही समावेश हाेता. या काळात ना तर या रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्यात आली. ना ही रस्ता व नालीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे ही कामे कधी सुरू करणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
...
रस्त्यांच्या या अवस्थेबाबत स्थानिक आमदारांना पूर्णपणे अवगत केले आहे. निधी प्राप्त हाेताच कामाला सुरुवात केली जाईल. ताेवर मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.
सुखदेव जीभकाटे,
उपसरपंच, मांढळ.