नागपूर: १ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर ३० जुलै रोजी कर्मचारी संघटनेच्या राज्य पातळीवरील नेत्यांना शासनाच्यावतीने चर्चेला बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. या चर्चेत तोडगा निघला नाही तर संप अटळ आहे.शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महसूल दिनाचे औचित्य साधून राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १ आॅगस्टपासून राज्यव्यापी संपाचे आवाहन केले आहे. संप शत:प्रतिशत यशस्वी व्हावा यासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचरणे यांनी पूर्व विदर्भाचा दौरा केला. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. शासनानेच हा संप लादल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संप टाळण्यासाठी शासन पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी ईदची सुटी असल्याने बुधवारी ३० जुलैला महसूल मंत्र्यांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊ शकते. मात्र कर्मचारी संघटना त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे. महसूल मंत्र्यांनी यापूर्वी दिलेले आश्वासन पाळावे, अशी त्यांची मागणी आहे.यासंदर्भात राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचरणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारसोबत चर्चा होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. मात्र अद्याप निरोप आला नाही, ३० तारखेला चर्चेचे निमंत्रण आल्यास जाऊ, मात्र आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांचा संप - शासनाकडून हालचाली
By admin | Published: July 29, 2014 12:47 AM