नागपूर : दुसरा आठवडा पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना अजून वेतन मिळाले नसल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
राज्य परिवहन महामंडळात हजारो अधिकारी, कर्मचारी काम करतात. राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसेसचे संचलन, व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी ही मंडळी सांभाळते. सरकारच्या इतर विभागांच्या तुलनेत त्यांना पगार आणि भत्तेही कमी स्वरूपात मिळते. मात्र, किमान वेतन महिन्याच्या महिन्याला ७ तारखेच्या आत मिळावे, अशी या सर्वांची अपेक्षा असते. मात्र, तेसुद्धा वेळेवर मिळत नाही. या संबंधाने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने न्यायालयाकडेही दाद मागितली आहे. त्यासंबंधाने गेल्या वर्षी निकाल देताना न्यायालयाने प्रत्येक महिन्याच्या देय तारखेस एसटी कामगारांना वेतन दिले पाहिजे, असा निकाल दिला होता, असे संघटनेचे पदाधिकारी सांगतात. मात्र, त्यालाही दाद मिळत नसून एसटी महामंडळाने वर्षाच्या पहिल्याच महिन्यात वेतनाच्या संबंधाने बोंबाबोंब चालविली आहे. दि. १२ जानेवारी होऊनही कर्मचाऱ्यांना एसटीकडून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
आम्ही काय करायला हवे?
प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी आंदोलन करावे लागते. आंदोलन केल्यास सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे एसटीच्या कर्मचारी संघटना जनहित लक्षात घेऊन काम करतात. मात्र, महिनाभर काम करूनही चक्क १२ तारखेपर्यंत आम्हाला वेतन मिळत नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे, असा उद्विग्न सवाल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी केला आहे.