नागपूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारल्याने शासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषद, आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. जवळपास २४ हजार हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला असून शासकीय कामे ठप्प झाली आहेत. आरोग्य सेवाही प्रभावित होत आहे. नागपूर जिल्हा तृतीय श्रेणी महसूल कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांची उपस्थिती रोडावली आहे. महापालिकेतील ९० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. काही कंत्राटी कर्मचारी कामावर आहेत. अशीच परिस्थिती जिल्हा परिषदेत असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने अखेर मंगळवारपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.