नागपूर : आरोग्य सेवेच्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. यासाठी नवी आरोग्यनीती तयार करण्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय विचार करीत आहे. खासगी क्षेत्राला आरोग्य सेवेशी जोडल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो. सध्याच्या स्थितीत शासकीय रुग्णालयांमध्ये कधी डॉक्टर तर कधी औषधांचा तुटवडा असतो. म्हणूनच नागरिकांना जोडणारी समग्र आरोग्यनीती बनविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. राज्य सरकारने खासगी क्षेत्रामधील सहभागाच्या माध्यमातून क्षयरोगाचा (टीबी) सामना करण्याकरिता सोमवारी ‘युनिव्हर्सल अॅक्सेस टू ट्यूबर्क्युलॉसिस केअर’(युएटीबीसी) या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ गडकरी यांनी केला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. वर्धा रोडवरील आयोजित एका हॉटेलमधील या कार्यक्रमात ‘९९ डॉट्स’ व नवीन ‘कार्टिज-आधारित न्युक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट’ तंत्रावर आधारित ‘सीबी नेट’ मशीनचे लोकार्पणही केले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, केंद्रीय आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. जगदीश प्रसाद, राष्ट्रीय आरोग्य मिशन महाराष्ट्राच्या मिशन संचालक आय.ए. कुंदन, केंद्राच्या क्षयरोग कार्यक्रमाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. सुनील खापर्डे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. ए. श्रीनिवास, राज्याचे क्षयरोग व कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. संजीव कांबळे, मुंबई महापालिकेचे अपर आयुक्त डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, शासकीय रुग्णालयाच्या कामाचे आॅडिट होणे आवश्यक आहे. अनेक रुग्णालयात औषधे आणि डॉक्टर उपलब्ध असताना सेवा मिळत नाही. याला काही प्रमाणात नोकरशाहीप्रणाली जबाबदार आहे. यासाठी धर्मदायी संस्था, एनजीओ व इतर विविध संस्थांना आरोग्य सेवेशी जोडायला हवे. स्वस्त औषधीसाठी देशभरात जेनेरीक औषधांची ३५ हजार दुकाने उघडण्यात येत आहे. कॅन्सरवरील औषधांच्या किमती कमी करण्यासाठी देशात याचे उत्पादन करण्यासाठी सांगण्यात आले आहे.यावेळी गडकरी यांनी टीबी आणि सिकलसेल या दोन्ही आजारांवर एकाच वेळी निदान करणारे यंत्र विकसित करा, आज गावखेड्यात याची नितांत गरज असल्याचेही आवाहनही केले. खा. तुमाने म्हणाले, गरिबांना चांगले आणि प्रभावी क्षयरोगावर उपचार मिळणे आवश्यक आहे. जगदीश प्रसाद म्हणाले, बहुविध औषध प्रतिरोधक क्षयरोगावर (एमडीआर टीबी) नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. १३ औषधांच्या प्रतिरोधकाची तपासणी करण्याचेही सांगण्यात आले आहे. जगातील एक चतुर्थांश टीबी रुग्ण देशात आहे. त्याला एक-अडीचस्तरावर आणायचे आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान ए. श्रीनिवास, डॉ. सुनील खापर्डे, डॉ. संजय देशमुख यांनीही आपले विचार मांडले. डॉ. संजीव कांबळे यांनी आभार मानले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल डॉ. जगदीश प्रसाद, डॉ. सुनील खापर्डे, डॉ. के.एस. सचदेवा, डॉ. खत्री, डॉ. देवेश गुप्ता, डॉ. श्रीनिवास, डॉ. रोहित सरीन, संजय देशमुख, डॉ. नदीम खान, डॉ. एम. चहांदे, डॉ. तुमाने, श्रीमती कुंदन, मोहन अभ्यंकर, डॉ. राम राजे, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. संजीव कांबळे, आरोग्य विभागाचे डॉ. संजीव जयस्वाल, पुनीत दिवाण, डॉ. सरनाईक, जोशी यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी) नागपुरात ५० हजार घरे४गडकरी म्हणाले, गरिबांसाठी एक हजार रुपये प्रति चौरस फुटाच्या आधारावर ४५० चौरस फुटांचे घर उपलब्ध करून दिले जाईल. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर उपलब्ध होऊ शकेल. नागपुरात सुमारे ५० हजार घर तयार करण्यात येतील, असेही ते म्हणाले. राज्यात १० टक्के क्षयरोगाचे रुग्ण४आय.ए. कुंदन म्हणाल्या, देशातील क्षयरोग आजाराच्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात १.३५ लाख क्षयरोगाचे रुग्ण आहेत. यातील १० हजार रुग्ण हे एमडीआर टीबीचे आहेत. रुग्णांवरील पोषक आहाराच्या प्रभावावर अभ्यास केला जात आहे.
आरोग्य क्षेत्रात रोजगारनिर्मित नीतीची गरज
By admin | Published: September 15, 2015 6:24 AM