उमरेड : तालुक्यातील शेडेश्वर येथील रोजगार सेवकाने आपल्या कुटुंबीयांनाच कामावर दाखवून अपहार केल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकरणाच्या पुन्हा काही धक्कादायक बाबी उजेडात येत आहेत. ‘तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. बँकेतून काढून आणा. काही तुम्ही ठेवा व बाकी आम्हाला द्या’ अशी ऑफर देत ग्रामरोजगार सेवकाने ‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही’ अशी या योजनेला चपखल बसणारी म्हण सार्थक ठरविल्याचे दिसून येत आहे.
उमरेड तालुक्यातील मानोरी येथील मिनेश विनायक मोडक याने उपरोक्त प्रकाराची लेखी तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयसिंग राठोड यांच्याकडे केली आहे. मिनेश मोडक याच्या तक्रारीनुसार, मानोरी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेडेश्वर येथील ग्राम रोजगार सेवक अंकुश भाऊराव पाटील याने जॉबकार्ड काढावयास सांगितले. बँक पासबुक, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रेसुद्धा मागितले, असे तक्रारीत नमूद आहे.
मी कामावर गेलो नसतानाही सचिव व ग्रामरोजगार सेवक यांनी माझी हजेरी लावली. शिवाय माझ्या नावे रक्कमसुद्धा बँकेच्या खात्यात जमा झालेली आहे, ती काढून घ्या. काही रक्कम आम्हास आणि काही रक्कम तुम्ही ठेवा, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही रक्कम मी संबंधितांना दिलेली नाही. मला योग्य मार्गदर्शन करावे, सदर रक्कम शासनास परत करण्यास तयार असल्याचीही बाब या तक्रारीत स्पष्ट केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत करण्यासाठीच्या या अफलातून अर्जाची चर्चा परिसरात असून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याप्रकरणी कोणती कारवाई करतात, याकडे अनेकांच्या नजरा आहेत.
----------------------------------------------------
सखोल चौकशी करा
मनरेगा अंतर्गत विखुरलेले वृक्ष लागवड भाग १ व २ या कामावरील हा प्रकार असून कामावर गेलो नसताना दिनांक २२ जून ते ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत हजेरी दर्शविण्यात आली आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी तक्रारकर्ते मिनेश मोडक यांनी केली आहे. रामचंद्र कोल्हे, अरविंद शंभरकर, अजय कोल्हे, चंद्रभान शंभरकर, शालीक धोटे, नितीन डंभारे, शंकर अराडे, वनिता धोंगडे, संघपाल शंभरकर, धनराज शंभरकर, हंसमाला मून, परसराम गोळघाटे आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.