निलंबन असंवैधानिक : स्थायी समितीचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कचरा संकलनाची निविदा व करारात बदल केलेल्या कारणावरून सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीने आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांना निलंबित केले होते. या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने आवाज उठविला आहे. संघटनेतर्फे महापौर, सत्तापक्ष नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष व आयुक्तांना पत्र देऊन निलंबन असंवैधानिक असल्याचा दावा केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला निलंबित करण्यापूर्वी त्याची विभागीय चौकशी केली जाते. दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई केली जाते किंवा दुसरी शिक्षा सुनावली जाते. मात्र, स्थायी समितीने आदेश देताना कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव न घेता करारावर स्वाक्षरी करणाऱ्याला तक्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबनापूर्वी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बाजू ऐकून घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. आधी निलंबन करणे व नंतर चौकशी ही व्यवस्थाच मान्य नाही. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश आहे. त्यामुळे गणवीर यांचे निलंबन तत्काळ रद्द करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. आदेश मिळाला नाही सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधून डॉ. गणवीर यांच्या निलंबनाचता आदेश आला का, अशी विचारणा केली असता नाही, असे उत्तर मिळाले. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आयुक्तांच्या निर्देशाचे विभागातर्फे पालन केले जाते. त्यांच्या दिशा निर्देशाशिवाय कुठलाही आदेश जारी केला जात नाही.
गणवीर यांच्या समर्थनार्थ कर्मंचारी संघटना सरसावल्या
By admin | Published: May 17, 2017 2:11 AM