नागपूर : एम्प्रेस सिटीतील निर्माणाधिन इमारतीच्या दहाव्या माळ्यावरून खाली पडून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीचा व्यवस्थापक आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुजीत वर्मा आणि तपन भौमिक अशी आरोपींची नावे आहेत.एम्प्रेस सिटीतील निर्माणाधिन इमारतीच्या दहाव्या माळ्यावर सेंट्रींगचे काम करताना खाली पडून बिजॉय मनू पहाडिया (वय २३) या मजुराचा करुण अंत झाला होता. १९ मेच्या दुपारी १२. ३० वाजता ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपासात कंपनीचे कंत्राटदार आणि पर्यवेक्षकाने धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली नसल्याचे उघड झाले. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच बिजॉयचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गणेशपेठ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपतराव परचाके यांनी आरोपी व्यवस्थापक सुजीत वर्मा आणि कंत्राटदार तपन भौमिक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)मृताच्या परिवाराचे कायमृत मजूर बिजॉयच्या घरची स्थिती अत्यंत गरीब आहे. त्याचमुळे तो स्वत:च्या आणि कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी खुर्शिदाबाद जिल्ह्यातून (पश्चिम बंगाल) चार महिन्यांपूर्वी नागपुरात कामाला आला होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांचा आधारच हरविला आहे. त्यामुळे त्याच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी मजुरांतर्फे केली जात आहे.
एम्प्रेस सिटीच्या व्यवस्थापक, कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा
By admin | Published: May 23, 2016 2:58 AM