महिला परिषदेत शिल्पा गणवीर यांचे मतनागपूर : आज मुलींनी शिक्षणात मोठी प्रगती केली असली तरी, आजही मुलींना सरकारी नोकरीपुरते प्रोत्साहित केले जाते. मात्र काळ बदलला आहे. सर्वच क्षेत्रात खासगीकरणाचे वारे वाहत असल्याने सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या असून, मुलामुलींना केवळ त्यावर अवलंबून ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे समाजाने मुलींना उद्योगक्षेत्रासह राजकारण, क्रीडाक्षेत्र व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याची वेळ आली असल्याचे मत तरुण उद्योजक शिल्पा गणवीर यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी १९४२ साली पहिली महिला परिषद घेतली होती. त्या अनुषंगाने संथागार फाऊंडेशन व लॉर्ड बुद्धा टीव्हीच्यावतीने विदर्भस्तरीय महिला परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेच्या चौथ्या सत्रात ‘महिलांची आर्थिक विकासात्मक वाटचाल’ या विषयावर त्या बोलत होत्या. महिलांनी उच्चशिक्षणात प्रगती केली असली तरी, आर्थिक गोष्टींच्या निर्णयासाठी घरच्या पुरुषांवर अवलंबून ठेवल्या जाते. हे चित्र बदलण्याची गरज आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचे लाखो पुरुष सैनिक मारल्या गेल्यानंतर तेथील महिलांनी पुढाकार घेऊन त्या राष्ट्राची नव्याने उभारणी केली. त्यामुळे भारतातील महिलांनीही पुढे येण्याचे धाडस करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुलांना सरकारी नोकरीची सवय लावण्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले. यावेळी भैयाजी खैरकर, डॉ. राधा पवार, सरला इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. या परिषदेमध्ये दिवसभर विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. दिवसभर चाललेल्या चर्चासत्रात भारत सरकारच्या एनएसएसचे क्षेत्र संचालक एम.एस. जांभुळे, गायक हरीश राऊत, सामाजिक कार्यकर्ता रुबीना पटेल, संध्या राजूरकर, चित्रा कहाते, सुनंदा वालदे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. रमेश तलवारे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)
सर्वच क्षेत्रात येण्यासाठी मुलींना प्रोत्साहित करा
By admin | Published: May 02, 2017 1:47 AM