लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित समाजासाठी कार्य करत असलेल्या कार्यकर्त्याना प्रस्थापित राजकारण्यांनी अधिक बळ देण्याची गरज आहे. असे केल्याने तो कार्यकर्ता ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्या समाजाला प्रगतीचा संधी निर्माण होतात. दुर्दैवाने अगोदरच प्रस्थापित असलेले नेते प्रस्थापित कार्यकर्त्यांनाच मोठे करतात. अशा वंचितांच्या प्रतिनिधी कार्यर्त्यांकडे दुर्लक्ष ही राजकारणाची शोकांतिका आहे. मात्र अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. चिटणवीस केंद्रातर्फे आयोजित ‘कलावंतांच्या मनातील मान्यवर’ या श्रृंखलेचे प्रथम पुष्प गुंफताना आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या उपक्रमांतर्गत डॉ. मनोज साल्पेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली व त्यांच्यातील कलात्मक भाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेते म्हणून दुर्लक्षित समाजघटकातील कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व दिले तर तो समाज जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करतो. समाजच नेतृत्व घडवतो, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. मी विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणात आलो. मात्र मी माझी आवड व ‘पॅशन’ नेहमी जपले. कृषीत वेगवेगळे प्रयोग करणे हे माझे ‘पॅशन’च आहे. आयुष्यात केवळ चांगले गुण मिळवून किंवा गुणवत्ता यादीत येऊनच यशस्वी होता येत असे नाही. अनेकदा अनुत्तीर्ण झालेले लोक आयुष्याच्या परीक्षेत अगदी ‘टॉप’वर पोहोचलेले पाहिले आहेत. त्यामुळे ज्यात रुची आहे, ते काम केले पाहिजे, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली. यावेळी विलास काळे, चिटणवीस केंद्राचे संचालक मोहन सरवटे, रवींद्र दुरुगकर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सचिन ढोमणे यांचे संगीत होते आणि सुरभी ढोमणे व अमर कुळकर्णी यांनी एकाहून एक सरस गीते सादर करत लोकांची मने जिंकली. नाना मिसाळ यांनी गडकरी यांचे ‘पोट्रेट’ काढले तर लहानगी व्यंगचित्रकार साची अरमरकर हिने त्यांचे व्यंगचित्र रेखाटले. श्रद्धा भारद्वाज यांनी कवितेचे सादरीकरण केले.
गाण्यांचे शब्द हे रसगुल्ले, गुलाबजामसारखेयावेळी उपस्थितांना गडकरी यांच्यातील कलाप्रेमीदेखील अनुभवायला मिळाला. मला तत्त्वज्ञानाशी जुळलेली गाणी आवडतात. संगीत, गायकाचा आवाज आणि गाण्याचे बोल यातून वेगळाच आनंद मिळतो. त्यातही शब्द तर मनाला भिडतात. गाण्यांचे शब्द हे अगदी रसगुल्ले व गुलाबजामसारखेच मनात घर करणारे असतात, असे नितीन गडकरी म्हणाले.
कलाकारांना लोकाश्रय व राजाश्रय हवादेशातील अनेक भागात गुणवंत खेळाडू व अतिशय दर्जेदार कलाकार आहेत. मात्र संधीअभावी ते समोर येऊ शकत नाही. कलाकार व खेळाडूंना आपल्याकडे हवे तसे प्रोत्साहन मिळत नाही. यांना लोकाश्रय व राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. मोफत पासेसच्या मागे न लागता मान्यवरांनी तिकीटं काढून कार्यक्रम पहायला जायला पाहिजे. पहिल्या रांगा ‘पास’धारकांसाठी का हव्यात, असा सवालदेखील त्यांनी केला.