लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील गोयल टॉकीज चौक व शुक्रवारी बाजार परिसरातील फूटपाथ दुकानदारांनी अतिक्रमण करून गिळंकृत केला आहे. रहदारीस अडसर निर्माण हाेत असल्याने अतिक्रमण हटविण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी, पालिका पदाधिकारी व नेत्यांच्या वरदहस्तामुळे दुकानदार मनमानी करीत आहेत.
शहरातील शुक्रवारी बाजार व गोयल टाॅकीज चौक ही मुख्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी छाेट्या दुकानदार व फेरीवाल्यांनी दाेन्ही बाजूच्या फूटपाथवर तसेच दुभाजकावर आपापली दुकाने थाटल्याने या भागातील मार्ग अरुंद झाले आहेत. हा परिसर आधीच गजबजलेला असून, अतिक्रमणामुळे नागरिकांना रहदारी करण्यास अडचणी येतात. दुकानांमुळे या भागातून पायी चालणे अवघड असल्याचेही अनेक नागरिकांनी सांगितले.
शुक्रवारी बाजार परिसरातील प्रिन्स टेलर नामक व्यक्तीने कपड्याचे दुकान थाटले आहे. त्यांनी त्यांच्या दुकानाचा हातठेला फूटपाथवर ठेवला आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारी एकाने त्याची मोटरसायकल उभी ठेवली. त्या कारणावरून भांडणाला सुरुवात झाली व प्रकरणी जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पाेहाेचले.
या बाजारातील दुकानदारांची वाढती मनमानी लक्षात घेता, स्थानिक नगरपालिका प्रशासनाने पाेलिसांच्या मदतीने शुक्रवारी बाजारातील पोलीस लाईन, गोयल टाॅकीज चौक, जयस्तंभ चौक ते गांधी चौक मार्ग, सिंधी लाईन ते फेरुमल चौक परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी कामठी शहर व तालुक्यातील काही गावांमधील नागरिकांनी केली आहे.
...
भांडणांचे प्रमाण वाढले
या बाजारात गर्दीमुळे नागरिकांना पायी चालताना अथवा दुचाकी वाहने चालविताना कसरत करावी लागते. त्यातून एकमेकांना धक्के लागत असल्याने भांडणेही उद्भवतात. प्रसंगी ही भांडणे हाणामारीवर जातात व पाेलीस ठाण्यात पाेहाेचतात. यातून अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणे, असे प्रकार आता सामान्य हाेत चालले आहेत.
...
बाजारातील गर्दी चाेरांच्या पथ्यावर
काेराेना संक्रमणामुळे नागरिकांना बाजारात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या बाजारात कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. मास्क असलेले ग्राहक व दुकानदार कमी प्रमाणात दिसून येतात. इच्छा असाे वा नसाे प्रत्येकाला याच गर्दीत खरेदी करावी लागते. या गर्दीमुळे चाेरटे खिशातील माेबाईल, राेख रक्कम, अंगावरील दागिने चाेरून नेत असल्याेचही नागरिकांनी सांगितले.
...
या बाजारातील अतिक्रमण पालिकेने यापूर्वी हटविले हाेते. शहरातील फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कठाेर कारवाई केली जाईल. दुकानदारांसह इतर नागरिक नियमांचे पालन करीत नसतील तर प्रशासनाला त्यांच्यावर सक्तीने कारवाई करीत अतिक्रमण हटवावे लागतील.
- संदीप बाेरकर, मुख्याधिकारी,
नगर परिषद, कामठी