- सक्करदरा चौक, गजानन नगर चौक, तिरंगा चौकात रस्त्यांवरच लावली जातात वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदरा चौक, गजानन नगर चौक, तिरंगा चौक या तीन चौकांचा त्रिकोण म्हणजे ‘टी पॉईंट’ आणि नाश्ता सेंटर हब झालेला आहे. शहरातील इतर कोणत्याही व्यस्त बाजारपेठेच्या तुलनेत या परिसरातील बाजारपेठेचा आवाका जरा कमीच असला तरी झणझणित समोसा आणि त्यावर उतारा म्हणून अमृततूल्य चहाचा फुर्का घेण्यासाठी येथे दूरवरून मंडळी जमते आणि तासन्तास गप्पा हाकत बसलेली असते. बाजारपेठांमध्ये गर्दी जमने ही समस्या नाही तर या मंडळींची वाहने मोठा अडथळा असतो. या परिसरात ‘चहापेक्षा केटली गरम’ ही उपमा विचारात घेतली तर येथे जमणाऱ्या गर्दीपेक्षा ग्राहकांच्या वाहनांची संख्याच मोठी असते. त्याचा फटका वाहतूकदारांना बसतो.
चौकांच्या त्रिकोणात मोठमोठी कपड्यांची, चपला-जोड्यांची दुकाने, औषधालये, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीची दुकाने, शेजारीच पोलीस स्टेशन, बँका, चहाचे जुने व नवे अमृततूल्य-नंबर १ सारखे हायफाय दालने, कायम गर्दी असणारी नाश्त्याचे सेंटर्स, जवळच संगम बिग सिनेमा आणि सोबतच मोठी लोकवस्ती आहे. या त्रिकोणातील कोणत्याही मुख्य रस्त्यावरून जा, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अवैध पार्किंग असलेली दिसून येते. त्यामुळे रस्ते मोठे असले तरी अवैध पार्किंगमुळे ते निमुळतेच भासतात आणि वाहकांना आपली वाहने काढण्यास अडचण निर्माण होते.
------------
विदर्भ कॉम्प्लेक्समधील वाहने रस्त्यावर
गजानन चौक ते तिरंगा चौकादरम्यान येणाऱ्या वळणावर भव्य असे विदर्भ कॉम्प्लेक्स आहे. येथे निवासी सदनिकांसोबतच व्यावसायिक दालनेही आहेत. व्यावसायिक दालनात येणारे कर्मचारी व त्यांच्या ग्राहकांची वाहने कॉम्प्लेक्सला लागूनच पार्क केली जातात; मात्र वाहनांची संख्या जास्त झाली की, ती सगळी वाहने रस्त्यावर अवैधरीत्या पार्क केली जातात.
-------------
विदर्भ कॉम्प्लेक्स ते तिरंगा चौकात वाहनांचाच बाजार
विदर्भ कॉम्प्लेक्स ते तिरंगा चौकापर्यंत नंबर वन, टिक टॉक, येवले अमृततूल्य आदी अनेक टी सेंटर्स आहेत. येथे चहा शौकिनांची प्रचंड गर्दी असते. बाजूलाच वेगवेगळ्या नाश्त्याची सेंटर्स आहेत. शिवाय
गँग्स्टा,
माफिया आदी ग्राहकांना आकर्षित करणारी युथ आयकॉन कपड्यांची दुकाने आहेत. स्ट्रीट फूडचे स्टॉल्सही आहेत. या सगळ्यांमुळे दोनशे मीटरच्या या मार्गावर दुतर्फा अवैध पार्किंगमुळे वाहनांचा बाजारच भरल्याचे भासते.
------------
* सक्करदरा ते गजानन चौकापर्यंत रेशिमबागेतील वस्त्यांमध्ये अवैधरीत्या वाहनांची होते पार्किंग.
* निवासी वस्त्यांमध्ये ग्राहकांच्या वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिक त्रस्त.
* बरेचदा स्थानिक नागरिकांनाच आपली वाहने पार्क करण्यासाठी जागा नसते. अशावेळी खटके उडतात.
* नो स्मोकिंग झोन असतानाही सिगारेटचे झुरके मारणाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त.
...................