लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होळीचा सण संपताच पाराही वेगाने चढायला लागला आहे. मार्च महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवसातच तापमानाचा पारा नागपुरात ४१ वर तर चंद्रपुरात ४३ अंशावर पोहचला आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक राहणार, असे दिसत आहे.
हवामान खात्याच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी नागपुरात किमान तापमान ४१.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत होती. सकाळी शुष्कता ३६ टक्के होती. तर सायंकाळी ती ११ टक्क्यांवर पोहचली. गेल्या २४ तासांमध्ये शहरातील तापमानात ०.४ अंशाने वाढ झाली. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवायला लागली होती. शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडले असले तरी मंगळवारी याची जाणीव अधिक झाली.
विदर्भात चंद्रपूर सर्वाधिक तापलेले असते. त्याचा अनुभव यंदाही येत आहे. मंगळवारी येथे ४३.६ अंश किमान तापमान नोंदविले गेले. मागील २४ तासामध्ये येथेही ०.८ सेल्सिअसची वाढ झाली आहे. सकाळी शुष्कता ३० टक्के होती, सायंकाळी ३५ टक्के नोंदविली गेली. सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा ४१ अंशावरच सरकला होता. बुलडाण्यात ४१ अंश, वाशिममध्ये ४१.१ अंश, तर अकोला व यवतमाळमध्ये ४१.७ अंश सेल्सिअस नोंद झाली. गडचिरोली आणि गोंदियात ४२ अंश तर अमरावती आणि वर्ध्यात ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.