आशिष राॅय
नागपूर : ऊर्जा मंत्रालयातर्फे नागपूरसह राज्यातील १६ शहरांमध्ये वीज वितरणाची जबाबदारी खासगी कंपन्यांना साेपविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूरमध्ये वीज वितरणाचे कंत्राट अदानी पाॅवरकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र ऊर्जा तज्ज्ञांनी या निर्णयाला विराेध दर्शविला आहे. त्यांच्या मते शासनाचा एकाधिकार खासगी कंपन्या घेऊ शकत नाहीत. एखाद्या कंपनीला एकाधिकार दिल्यास ग्राहकांना लाभ हाेणार नाही, असा दावा केला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, माेबाईल कंपन्यांप्रमाणे वीज वितरणाची जबाबदारी तीन किंवा चार कंपन्यांकडे देणे आदर्श ठरेल, ज्यातून ग्राहक सर्वाेत्तम कंपनीची निवड करतील. किमान दाेन कंपन्या तरी असायला हव्यात. याचा अर्थ महावितरणकडून येथील जबाबदारी काढण्यात येऊ नये. अशाप्रकारची व्यवस्था मुंबई शहरात असून, येथे अदानी व टाटा पाॅवरमध्ये असलेल्या स्पर्धेतून ग्राहकांचा लाभ हाेईल.
विदर्भ इंडस्ट्रिज असाेसिएशनचे आर. जी. गाेयनका म्हणाले, खासगी कंपनीद्वारे महावितरणला बदलविणे याेग्य निर्णय ठरू शकत नाही. एकापेक्षा अधिक कंपन्या असाव्यात, जेणेकरून ग्राहक सर्वाेत्तमची निवड करतील. टेलिकाॅम क्षेत्रातील स्पर्धेमुळे ग्राहकांना लाभ मिळताे. बीएसएनएलचा एकाधिकार असलेल्या काळापेक्षा आज दर खूप कमी झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासनाने खासगी कंपन्यांबाबत गुजरात पॅटर्नचा स्वीकार करावा. गुजरातमध्ये सरकार विविध स्राेतांकडून वीज खरेदी करते आणि महागड्या दरात टाेरेन्ट पाॅवरला विकते, जिच्याकडे अहमदाबाद, गांधीनगर व सुरतचा वितरणाचा परवाना आहे. राज्याच्या कंपनीला शेतकऱ्यांना पुरवठा करावा लागताे, त्यामुळे स्वस्त वीज मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जर नागपूरमध्ये अदानीला एकाधिकार दिला, तर ग्राहकांना दरामध्ये फायदा मिळणार नाही. शासनाने कंपनीला कुठूनही स्वस्तात वीज खरेदी करण्याचा परवाना द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
ऊर्जा तज्ज्ञ महेंद्र जिचकार यांनीही नागपुरात एकापेक्षा अधिक कंपन्यांना वीज वितरणाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली. जर हे शक्य नसेल, तर कंपनीला महाजेनकाेकडूनच महागडी वीज खरेदी करण्याचेही बंधन नसावे. कंपनीला कुठूनही स्वस्त वीज खरेदीचा अधिकार मिळावा, जेणेकरून नागपूरकरांना स्वस्त वीज मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ए. पी. गांगुली यांच्या मते बहुकंपन्यांकडून वितरण ग्राहकांना फायदेशीर ठरते. मात्र नागपुरात एकापेक्षा अधिक खासगी कंपन्या वीज वितरणास तयार हाेतील का, हा प्रश्न आहे. शहरात माेठे उद्याेग नाहीत. कंपन्यांना समूहात माेठे ग्राहक हवे असतात, तेव्हाच एकापेक्षा अधिक कंपन्यांचा व्यवसाय मिळेल व तीन-चार कंपन्या तग धरू शकतील. हे माॅडेल मेट्राे शहरामध्ये कार्य करू शकतात, असे मत गांगुली यांनी व्यक्त केले.