सेवाग्राम (वर्धा) : सेवाग्राम व पवनार आश्रमाला दरवर्षी मी भेट देत असते. या ठिकाणी ऊर्जा मिळत असून, हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आपल्याला स्वातंत्र्य दिले याची जाणीव ठेवून त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. त्या वर्धा दौऱ्यावर असताना त्यांनी प्रारंभी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.
खासदार सुप्रिया सुळे यांचे सेवाग्राम आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, मंत्री चतुरा रासकर, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत आदींनी सूतमाळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना सेवाग्राम आश्रमाला अद्याप जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळाला नाही, असा प्रश्न विचारला असता, सेवाग्राम आश्रम हे जागतिक पर्यटन नसून मोठा विचार आहे. त्याच विचार पद्धतीने त्याकडे पाहिले पाहिजे. बापूंनी भारतात ज्या गोष्टी केल्या आहेत, जी मूल्ये दिली, ती विचार आणि कृतीतून अंगीकारली पाहिजेत, असेही खा. सुळे यांनी सांगितले. त्यांनी सेवाग्राम आश्रम परिसरातील आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास, बापू दप्तरची पाहणी केली. तसेच महादेव कुटीतील कापूस ते कापड या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. आश्रमच्या मंत्री चतुरा रासकर यांनी संपूर्ण माहिती दिली. योवळी माजी आ. प्रा. सुरेश देशमुख, प्रदेश संपर्कप्रमुख सुबोध मोहिते, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, ॲड. सुधीर कोठारी, किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अभिजित फाळके पाटील यांची उपस्थिती होती.
प्रमाणपत्राची सक्ती करू नये, खादी असरकारी असावी!
सेवाग्राम आश्रमात खादीचे उत्पादन गांधीजींच्या काळापासून परंपरागत सुरू आहे. खादी हा विचार, मूल्य, स्वावलंबन, आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रभावी साधन असल्याने आजही आश्रमात कायम आहे; पण खादी व ग्रामोद्योग आयोग विभागीय कार्यालय, नागपूर यांनी आश्रमाला पत्र पाठवून खादी प्रमाणपत्र नसल्याने खादी उत्पादन बंद करण्यास सांगितले, अशी माहिती मंत्री चतुरा रासकर यांनी खा. सुप्रिया सुळे यांना दिली. तसेच प्रमाणपत्र घेणे सरकारचा नियम असला तरी खादी प्रमाणपत्राची सक्ती न करता खादी असरकारी असावी, यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती रासकर यांनी केली.