नागपूर : आरएसएसचे तत्कालीन सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट अटकेच्या भीतीपोटी नाकारल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत. वणी येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राऊत हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सरसंघचालक हेडगेवार यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, नाशिकमध्ये तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार मुक्कामी होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या खासगी सचिवाला निरोप देऊन त्यांच्या भेटीला पाठवले. मात्र, हेडगेवार यांनी आपण आजारी आहोत, भेटायचे नाही, असे सांगत भेट नाकारली. ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने हेडगेवार यांनी ही भेट नाकारली, असल्याचे राऊत म्हणाले. यांनीच जाती जातीत भांडण तंटे उभे केले आता तेच गुलाम लोक आज शिकवायला निघाले, असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' असे म्हटले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलेच वादंग निर्माण झाले. ठिकठिकाणी पटोलेंविरोधात आंदोलन करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मी गावातील एक मोदी नामक एका गुंडाबद्दल टिप्पणी केली असल्याचे म्हणत सारवासारव केली होती. तर, आता राऊत यांनी हेडगेवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आगीत ठिणगी उठणार असल्याची चिन्हे आहेत.