नागपूर : खासगीकरण तसेच कामगारविरोधी धोरण याच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी देशभरात दोन दिवसीय संप पुकारला आहे. वीज कर्मचाऱ्यांनीही या संपात सहभाग नोंदवला आहे. यावर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी, कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. कामगारांशी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू, असेही राऊत म्हणाले आहेत.
उन्हाळ्याचे दिवस आहेत, दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, आम्ही चर्चेतून मार्ग काढू. आर्थिक संकटात असताना यावर मात करत आम्ही पुढं जात आहोत. वीज कर्मचारी संघटनांसोबत चर्चेतून मार्ग निघेल, अस वाटत आहे. मात्र आम्ही संप करू तरीही आम्हाला कुणी अडवणार नाही, असं कुणीही समजू नये. सरकार कठोर होईल, मेस्मा अंतर्गत कारवाई करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समितीने आजपासून २ दिवसीय संप पुकारला आहे. नागपुरात या संपाला चांगला प्रतिसाद मिळत असून महावितरणचा मुख्य कार्यालय असलेल्या विद्युत भवन समोर कर्मचारी आणि अभियंते संपावर बसले आहेत. यासह, देशभरात विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचा विद्युत संशोधन बिल अमलात आला तर खासगीकरणाची गती वाढेल आणि कर्मचाऱ्यांचा नुकसान होईल अशी भीती संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना आहे.
केंद्रीय उर्जा मंत्रालयाचा इशारा
सरकारी धोरणांच्या निषेधार्थ आज आणि उद्या देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, यामध्ये वीज, वाहतूक, विमा, बँका, रेल्वे यासह अनेक क्षेत्रात खासगीकरणाला विरोध करण्यात येणार आहे. रस्ते, वाहतूक आणि वीज विभागाचे कर्मचारी यांच्या सहभागामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्जा मंत्रालयाने रविवारी सर्व सरकारी यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांसाठी संपकाळात महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आला आहे.