लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात महिन्यानंतर प्रशिक्षण विमानांचे इंजिन अमेरिकेतून नागपुरात पोहोचले असून बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या संदर्भात एक महिन्यापूर्वी लोकमतने नागपूर फ्लाईंग क्लबसंदर्भात काही बातम्या प्रकाशित केल्या होत्या. या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर नागपूर फ्लाईंग क्लबच्या व्यवस्थापकीय संचालकाची (एमडी) बदली झाली असून आता नवीन एमडी पदभार सांभाळणार आहे.
नागपूर फ्लाईंग क्लबकरिता दोन विमानांचे नवीन इंजिन जवळपास सात महिन्यांपासून अमेरिकेतून आले नव्हते. यापूर्वी एक नवीन इंजिन पाठविण्यात आले होते. आता नागपूर फ्लाईंग क्लबजवळ विमानांचे तीन इंजिन आहेत. एक दुरुस्तीसाठी भोपाळला पाठविले आहे. ते दोन आठवड्यात येण्याची शक्यता आहे. क्लबमध्ये नवीन इंजिन बसविण्याचे काम सुरू झाले आहे. विमानांचे स्पेअर पार्टही आले आहेत. काही अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतर विमान डिसेंबरच्या प्रारंभी उड्डाणासाठी तयार होणार आहे. सध्या चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरचे (सीएफआई) प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. सीएफआयच्या नियुक्तीसह येथून प्रशिक्षण उड्डाणे सुरू होईल.