नागपूर : गोधनी रेल्वेस्थानकावर रेल्वे इंजिनची चार चाके रुळावरून खाली घसरली. गुरुवारी सकाळी ७.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. तीन तासांच्या परिश्रमानंतर रेल्वे इंजिन रुळावर आणण्यात आले. लुपलाइनवरील या घटनेचा मेन लाइनवरील वाहतुकीवर कोणताच प्रभाव पडला नाही.
गोधनी रेल्वेस्थानकावर सकाळी ७.३० वाजता रेल्वे इंजिनची चार चाके रुळाखाली घसरली. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ रिचा खरे, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप कुमार सतपथी, पीडब्ल्यूआय आर. ओ. रंगारी, गोधणी येथील अभियंता रामजी पासवान, आरपीएफचे निरीक्षक आर.एल. मीना, सहायक उपनिरीक्षक सी. बी. अहिरवार घटनास्थळी पोहोचले. लगेच रुळावरून घसरलेल्या इंजिनला रुळावर आणण्याचे काम सुरू झाले. सकाळी १०.२० वाजता या इंजिनची चारही चाके रुळावर आणण्यात यश आले. इंजिन घसरलेली लुपलाइन दिल्ली मुख्य मार्गाच्या बाजूलाच आहे. परंतु लुपलाइनवर इंजिनची चाके घसरल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नाही. ही घटना मेन लाइनवर घडली असती तर दिल्ली मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असती.
...........