नागपूर : विदर्भ एक्स्प्रेसचे इंजिन अचानक कोच सोडून पळाले. प्रेशर कमी होताच इंजिन थांबले. दोन डब्यांना जोडले जाणारे कपलिंग निघल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भंडारा रोड ते खात रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिरा धावत होती. या गाडीला गोंदियाहून रिशेड्युल्ड करण्यात आले. नागपूरच्या दिशेने गाडी येत असताना सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भंडारा रोड ते खात रेल्वे स्थानकादरम्यान ‘विदर्भ’चे कपलिंग निघाले. तांत्रिक कारणामुळे इंजिनपासून दुसऱ्या क्रमांकाचे कपलिंग निघाल्याने कोच सोडून इंजिन पळाले. दोन डब्यांना जोडणारे कपलिंग सुटताच डबे आणि इंजिन यांमधील अंतर वाढले आणि इंजिन थोड्याच अंतरावर जाऊन थांबले.
या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली. तत्काळ कपलिंग जोडून गाडी ६.४० वाजता पुढील प्रवासाला निघाली. तांत्रिक घटनेमुळे गाडीला पुन्हा उशीर झाल्याने नागपुरात गाडी उशिरा पोहोचली.