लाेकमत न्यूज नेटवर्कगाेंडखैरी : मशीनजवळ काम करीत असताना अभियंता अनावधानाने मशीनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील चिचभवन निमजी परिसरातील कंपनीमध्ये गुरुवारी (दि. ६) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
अमित संतोषी चौधरी (२३, रा. सेलगाव, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ताे १४ मैल परिसरातील चिचभवन निमजी शिवारात असलेल्या लाॅजिस्टिक पार्कमधील कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करायचा. ताे गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे कंपनीमधील मशीनसमाेर काम करीत हाेता. त्यातच अनावधानाने ताे मशीनमध्ये अडकला. ही बाब लक्षात येताच कंपनीचे व्यवस्थापक अभिजित देशमुख व सहकाऱ्यांनी त्याला मशीनमधून बाहेर काढले आणि लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले.माहिती मिळताच अमितच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी कंपनी व नंतर ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यातच प्रमाेद बागडे यांच्यासह इतरांनी मृताच्या कुटुंबीयांना ३० लाखांची आर्थिक मदत करावी तसेच त्याच्या धाकट्या भावाला कंपनीत नाेकरी द्यावी, अन्यथा अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी आग्रही भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला हाेता. यासंदर्भात त्यांची व्यवस्थापक अभिजित देशमुख व कंपनी व्यवस्थापनाशी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू हाेती. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.