लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमेरिकेत उच्चशिक्षणाचे स्वप्न रंगवित असलेल्या एका अभियंता तरुणीला सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढले. तिला आवश्यक असलेले प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची बतावणी करून कथित अमेरिकन आरोपीने तिचे तब्बल सव्वाआठ लाख रुपये उकळले. आरोपीची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी शनिवारी माहिती तंत्रज्ञान कायद्याचा गैरवापर करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.सानिया राजीव गांधी (वय २६) असे फसगत झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती शिवाजी चौकाजवळच्या योगेंद्रनगरात राहते. हैदराबादमधील एका कंपनीत ती अभियंता म्हणून सेवारत आहे. अमेरिकेत उच्चशिक्षण घेतल्यास पद आणि प्रतिष्ठेसोबतच लठ्ठ पगारही मिळेल, असा विचार करून तिने तेथे जाण्याची तयारी चालविली होती. आवश्यक कागदपत्रे जुळविल्यानंतर तिला आयईएलटीएस सर्टिफिकेटची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते मिळवण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. या संबंधाने तिने आपल्या फेसबुकवर २१ आॅगस्ट २०१९ ला एक पोस्ट अपलोड करून आयईएलटीएस सर्टिफिकेट संबंधी मदत मागितली. ग्रेक जॉन्सन रे नामक आरोपीने तिच्याशी संपर्क केला. आपण अमेरिकेत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगून आयईएलटीएस सर्टिफिकेट मिळवून देऊ शकतो, अशी बतावणी केली. फेसबुकवरून चॅटिंग करताना आरोपीने सानियाला व्हॉटस्अॅप नंबर मागितला. त्यानंतर ते सर्टिफिकेट संबंधाने नियमित चॅटिंग करू लागले. या दरम्यान आरोपीने सानियाचा फोटो आणि पासपोर्टची झेरॉक्सही मागून घेतली. ते सर्व झाल्यानंतर आरोपीने या सर्टिफिकेटसाठी अमुक बाबीवर इतका, तमुक बाबीवर इतका खर्च येतो, असे सांगून तरुणीला वेगवेगळ्या खात्यात रक्कम भरायला बाध्य केले. सहा महिन्यापासून सुरू झालेली रक्कम जमा करण्याची मालिका सुरू झाली. ती थांबता थांबेना. आरोपी ग्रेक जॉन्सन रे याने सानियाला आतापावेतो तब्बल ८ लाख, २३ हजार ४१० रुपये वेगवेगळ्या खात्यात जमा करायला बाध्य केले. मात्र, आयईएलटीएस सर्टिफिकेट मिळवून दिले नाही. एवढी रक्कम आपल्या खात्यात वळती करूनही आरोपी परत परत रक्कम जमा करायला सांगत असल्याने सानियाने आपल्या नातेवाईक तसेच अन्य काही परिचितांसोबत संपर्क केला. त्यानंतर आरोपीसोबत अनेकांनी संपर्क साधला. त्यानंतर कथित ग्रेक जॉन्सनने प्रतिसाद देणे बंद केले.
नागपुरात अभियंता तरुणीचे सव्वाआठ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:29 AM
अमेरिकेत उच्चशिक्षणाचे स्वप्न रंगवित असलेल्या एका अभियंता तरुणीला नागपुरात सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढले.
ठळक मुद्देयूएएसमधील उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल